| पनवेल | वार्ताहर |
तळोजा औद्योगिक वसाहतींमधून रात्री सोडल्या जाणाऱ्या घातक वायूमुळे कळंबोली, खारघर, कामोठे, खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल या सिडको वसाहतींमधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. जलप्रदूषणाबरोबरच दिवसेंदिवस वायुप्रदूषणही वाढत असल्याने तळोजा औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषणकारी कंपन्या इतर ठिकाणी स्थलांतरित करा, अशी मागणी रहिवासी करीत आहेत. त्याकरिता एक जनचळवळ उभी राहत आहे.
डोंगररांगा आणि हिरवेगार झाडीझुडपांमुळे खारघरला निसर्गाचे वरदान लाभले आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून तळोजा औद्योगिक वसाहतींमधून निघणाऱ्या घातक वायूमुळे खारघरची हवा दूषित झाली आहे. खारघरप्रमाणे कामोठे, कळंबोली, तळोजा, रोडपाली आदी भागातील रहिवाशांना रोज रात्री आणि मध्यरात्री दुर्गंधीयुक्त हवेचा सामना करावा लागत आहे. याविरोधात लढा देण्यासाठी एकत्र येत रहिवाशांनी फाईट अगेन्स्ट पोल्युशन असा समाजमाध्यमावर एक गट तयार केला असून एक हजारांहून अधिक नागरिक, पर्यावरणवादी, पशूप्रेमी सहभागी आहेत. 3 डिसेंबरपासून चळवळीला सुरुवात झाली आहे. सर्व नागरिकांना चळवळीत सहभाग घेत समाजमाध्यमांवर संदेश देणारे बॅनर व्हायरल केले आहेत. रोज सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांना प्रदूषणाबाबत माहिती देत चळवळीत सहभागी घेतले जात आहे.