| अलिबाग | प्रतिनिधी |
सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून महिला तलाठ्याने 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 4) रोजी सायंकाळी खंडाळे येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून तिला लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईने लाच घेणाऱ्यांना दणका मिळाला आहे.
पल्लवी यशवंत भोईर (39) असे या लाचखोर तलाठी महिलेचे नाव आहे. या महिलेची खंडाळे येथील तलाठी कार्यालयात नेमणूक होती. त्यात अतिरिक्त कार्यभार बामणोली येथील तलाठी कार्यालयाचा त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. लोणारे येथील गट नं. 40/01, क्षेत्र 0-57-0 येथील जमीन ही तक्रारदाराची वडिलोपार्जित असल्याने या जमिनीवर वारस नोंदणीसाठी तक्रारदाराने अलिबाग येथील तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून आदेश देण्यात आले. वारस नोंदणीसाठी तलाठी पल्लवी भोईर यांच्याकडे तक्रारदार गेले. परंतु, त्यांच्याकडून वारस नोंदणी करण्यास टाळाटाळ होऊ लागली. वारस नोंदणीसाठी भोईर हिने तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची मागणी दि.4 जुलै रोजी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या तक्रारदाराने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशीकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नवनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस शिपाई सचिन आटपाडकर, महिला पोलीस नाईक स्वप्नाली पाटील यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने पडताळणी करून सायंकाळी खंडाळे येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी पल्लवी भोईर हिला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
मागील महिन्याभरात जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातील अप्पर कोषागारा अधिकारी व लेखा कोषागार यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर आता महसूल विभागातील कर्मचारी लाच घेताना सापडला आहे. या घटनेनंतर लाच घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे उघड होत आहे.