सात बार्यावर नाव नोंदीसाठी दहा हजारांची लाच
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सात बार्यावर नाव नोंदीसाठी सुकापूर-पनवेल येथील मंडळ अधिकारी संजय विष्णू पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नवी मुंबई युनिटने लाच घेताना अटक केली आहे. दहा हजारांची लाच घेताना त्याला अटक झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात अलिबाग तहसीलदार मीनल दळवी यांना लाच घेताना अटक केल्यानंतर पुन्हा एकदा नव्या वर्षात कारवाई झाल्याने भुवया उंचावल्या आहेत. संजय पाटील (55) खांदा कॉलनी, महात्मा शाळेजवळ, ता. पनवेल येथे राहतात. ते पनवेल तालुक्यातील सजा सुकापूर सिल्लोत्तरचे तलाठी आहेत. सध्या त्यांची नेमणूक अलिबाग तहसील कार्यालय मंडळ अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
यातील तक्रारदार यांचे राहते मातोश्री को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे नाव सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी संजय पाटील यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड करून 10 हजार रुपये लाच देण्याचे मान्य झाले. त्यानुसार आज शुक्रवारी (13 जानेवारी) लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस हवालदार जाधव,पोलीस हवालदारपवार, महिला पोलीस नाईक बासरे, पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई माने, पोलीस शिपाई चौलकर यांनी सापळा रचून संजय पाटील याला अटक केली.