श्रावणीच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा; आयआयईएसटी शिबपूरमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगला प्रवेश
|चौल | प्रतिनिधी |
आकाशात दिसणाऱ्या चंद्र-ताऱ्यांकडे केवळ कुतूहलाने पाहणाऱ्या एका चिमुकल्या मुलीने तेव्हाच मनाशी एक स्वप्न घट्ट बांधलं होतं… ‘एक दिवस मला याच अंतराळात काम करायचंय!’ त्या स्वप्नाला अभ्यासाची शिस्त, मेहनतीची जोड आणि आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्याची साथ मिळाली. रायगडच्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेची छाप उमटवणारी अलिबाग तालुक्यातील पंतनगरची लेक श्रावणी अमर थळे हिने आता आपल्या स्वप्नाच्या दिशेने आकाशाएवढी मोठी झेप घेतली आहे. देशातील प्रतिष्ठित आयआयईएसटी शिबपूरमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवत तिने अंतराळाच्या दिशेने आपल्या आयुष्यातील पहिलं पाऊल टाकलं आहे. भविष्यात इस्रोची शास्त्रज्ञ होऊन देशसेवा करण्याचं श्रावणीचं स्वप्न आहे.
देशातील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIEST), शिबपूर येथे तिला एरोस्पेस इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे तिच्या अंतराळ स्वप्नाच्या दिशेने आता पहिले ठोस पाऊल पडले आहे. 1856 मध्ये स्थापन झालेली आयआयईएसटी शिबपूर ही भारतातील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्थांपैकी एक असून, भारत सरकारने तिला ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा’ दर्जा दिला आहे. अशा संस्थेत प्रवेश मिळवून श्रावणीने आपल्या कष्टांना यशाची पहिली पावती मिळवून दिली आहे.
श्रावणीने 2024 मध्ये पनवेल येथील सी.के.टी. विद्यालयातून दहावीची परीक्षा 98.80 टक्के गुणांनी उत्तीर्ण होत संपूर्ण रायगड जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. बारावीमध्येही तिने 76 टक्के गुण मिळवले. त्यानंतर जेईई ॲडव्हान्समध्येही चांगली कामगिरी करत तिने आयआयईएसटी शिबपूरमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवला.
अभ्यासाबरोबरच श्रावणीने आपल्या कलागुणांनाही जपले आहे. भरतनाट्यममध्ये ती पारंगत असून, पुणे विद्यापीठाची ती सुवर्णपदक विजेती आहे. अभ्यास, कला आणि भविष्यातील ध्येय यांचा सुंदर समतोल साधत तिने ही कामगिरी केली आहे. या स्वप्नासाठी तिने अभ्यास, जिद्द आणि मेहनतीची साथ सोडली नाही. त्यामुळेच श्रावणीच्या स्वप्नाला नवी दिशा दिली आहे.
चंद्र-ताऱ्यांकडे पाहताना मनाशी बांधली होती गाठ
लहानपणापासूनच आकाशातील चंद्र, सूर्य, तारे आणि ग्रहांविषयी श्रावणीला प्रचंड कुतूहल होते. या विषयाचा ती सातत्याने अभ्यास करत होती. त्यातूनच ‘मला अंतराळात काम करायचं, एरोस्पेस इंजिनिअर व्हायचं आणि इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून देशासाठी काम करायचं,’ हे स्वप्न तिने मनाशी पक्कं केलं. आज शिबपूरमध्ये मिळालेला प्रवेश म्हणजे या स्वप्नाच्या दिशेने पडलेलं पहिलं महत्त्वाचं पाऊल आहे.
आई-वडिलांच्या कष्टांचं सार्थक करायचंय!
श्रावणी मूळची अलिबाग तालुक्यातील पंतनगरची. वडील कामानिमित्त पनवेल येथे स्थायिक झाल्याने तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पनवेलमध्ये झाले. वडील अमर थळे हे खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असून, आई रिना थळे या पनवेलमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. आजोबा राम थळे आणि आजी तिलोत्तमा थळे यांचेही तिला सातत्याने मार्गदर्शन लाभले. श्रावणीच्या यशामागे आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. लहानपणापासून तिच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नांसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव श्रावणीला आहे. त्यामुळे ‘आई-पप्पांनी माझ्यासाठी घेतलेल्या कष्टांचं सार्थक करून दाखवायचं आहे,' हीच भावना तिच्या मनात आहे.
आयआयईएसटी शिबपूरविषयी थोडक्यात
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIEST), शिबपूर ही पश्चिम बंगालमधील हावडा येथे असलेली देशातील प्रतिष्ठित तंत्रज्ञान व संशोधन संस्था आहे. 1856 मध्ये स्थापन झालेली ही भारतातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असून, भारत सरकारने तिला ‘राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा' दर्जा दिला आहे. संस्थेत एरोस्पेस, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, संगणक अभियांत्रिकी, वास्तुकला यांसह विविध शाखांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण व संशोधन केले जाते. अंतराळ, विमाननिर्मिती, संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी .. शिबपूर ही महत्त्वाची संस्था मानली जाते.
एरोस्पेस इंजिनिअरिंग नक्की काय?
श्रावणी एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार असून, विमान, अंतराळयान, उपग्रह आणि क्षेपणास्त्रांच्या रचना, निर्मिती व चाचणीचा अभ्यास करणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेत तसेच अंतराळात प्रवास करणारी वाहने अधिक सुरक्षित, सक्षम आणि कार्यक्षम बनविण्यासाठी ती काम करणार आहे. भविष्यात अंतराळ क्षेत्रात संशोधन करून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून देशसेवा करण्याचे तिचे स्वप्न आहे.
अभ्यासातील एकाग्रता, जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर यश नक्कीच मिळते. लहानपणापासूनच मला चंद्र, तारे, ग्रह आणि अंतराळाबद्दल कुतूहल होते. तेव्हाच मी एरोस्पेस इंजिनिअर होण्याचे आणि अंतराळ क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पाहिले. आता आयआयईएसटी शिबपूरमध्ये प्रवेश मिळाल्याने त्या स्वप्नाच्या दिशेने माझे पहिले पाऊल पडले आहे. भविष्यात इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करून देशसेवा करण्याचे माझे ध्येय आहे. माझ्या या प्रवासात आई-पप्पा, आजी-आजोबा आणि शिक्षकांनी दिलेला पाठिंबा माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे. त्यांनी माझ्यासाठी घेतलेल्या कष्टांचे सार्थक करून दाखवायचे आहे.
श्रावणी थळे







