कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
|रोहा | प्रतिनिधी |
कोलाड येथील धगडवाडी परिसरात रिव्हर राफ्टिंगदरम्यान झालेल्या दुर्घटनेत मुंबईतील तरुण पर्यटक मनोज अमर नाथ याचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता गंभीर वळण मिळाले आहे. या दुर्घटनेमागे केवळ अपघात नसून घातपाताचा संशय असल्याचा गंभीर आरोप मृत तरुणाची आई जानकीदेवी अमर सिंह नाथ यांनी केला आहे. संबंधित रिव्हर राफ्टिंग कंपनी, रिसॉर्ट, आयोजक, प्रशिक्षक आणि इतर जबाबदार व्यक्तींविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित शासकीय विभागांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
12 जुलै 2026 रोजी कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धगडवाडी येथे रिव्हर राफ्टिंगदरम्यान बोट दगडावर आदळून उलटली. या दुर्घटनेत मनोज अमर नाथ याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, मुलाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत त्याच्या आईने आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
राफ्टिंगदरम्यान सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का? पर्यटकांना योग्य दर्जाचे जीवरक्षक जॅकेट देण्यात आले होते का? प्रशिक्षक पात्र आणि प्रशिक्षित होते का? बचावकार्य वेळेत करण्यात आले का? संबंधित कंपनीकडे राफ्टिंगसाठी आवश्यक परवानग्या होत्या का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आपल्या मुलाचा घातपात करून मृत्यू घडवून आणल्याचा संशय असून, या गंभीर घटनेला अपघाताचे स्वरूप देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मृताच्या आईने केला आहे. पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही त्याबाबत चालढकल होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
त्यामुळे संबंधित राफ्टिंग कंपनीची सेवा तातडीने बंद करून, कंपनीचे संचालक, आयोजक, प्रशिक्षक आणि घटनेशी संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी करावी. तसेच दुर्घटनेची निष्पक्ष, तांत्रिक आणि सर्वंकष चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून उपलब्ध पुरावे, तांत्रिक बाबी आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांच्या आधारे तपास सुरू असल्याचे कोलाड पोलीस ठाण्याचे प्रभारी भारत फारने यांनी सांगितले. तपास पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध पुरावे आणि निष्कर्षांच्या आधारे आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.







