। कोल्हापुर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात कर्नाटकच्या हद्दीत कन्नड वेदिका संघटनेच्या महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष करून तोडफोड केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना लक्ष्य करणे तसेच कर्नाटकातील प्रवासी वाहने, एस. टी. बसेस यांना अडवून त्यांचे नुकसान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सीमावर्ती भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्प निर्माण होऊ शकतो. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याची माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हापूर व कर्नाटक सीमा जोडणारे तांदूळवाडी ते कोगनोळी टोल हा सुमारे 50 किमी अंतराचा असल्याने आंदोलनाकरिता नॅशनल हायवेवर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात 9 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
या आदेशान्वये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणुका काढणे व सभा घेण्याला बंदी असणार आहे. शिवाय ग्रामपंचायत निवडणुका सुध्दा लागल्या असून आचारसंहिता सुरू आहे. अशा वेळी अधिकार बजावण्यासंबंधी तसेच निवडणुकीचे कामकाज करताना आणि ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक कोल्हापूर, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण-उत्सव-जयंती-यात्रा हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना जमावबंदी आदेश लागू नाही असे पत्रकात म्हटले आहे.