| पनवेल | वार्ताहर |
अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेलमधून 24 लाख 34 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. बांद्रा येथे राहणारी व्यक्ती कारमधून हा गांजा घेऊन त्याठिकाणी आली होती. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने त्याठिकाणी सापळा रचून कारवाई केली. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने सापळा रचला होता. यामध्ये संशयित कारवर पोलिसांनी झडप घालून एकाला ताब्यात घेतले होते. यावेळी कारमध्ये 61 किलो 200 ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी वसीम कुरेशी (43) याच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो बांद्रयाचा राहणारा असून त्याने गुन्ह्यात वापरलेली कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. पनवेल परिसरात पुन्हा एकदा अमली पदार्थाची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाकडून गांजा जप्त
