खोपोली शहरात अँटी रेबीज लस देण्याचा उपक्रम

। खोपोली । प्रतिनिधी ।

खोपोलीत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा त्रास नागरिकांना नेहमीच होतो. भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रकार सर्रास घडतात. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रेबीज नावाचा जीवघेणा रोग जडण्याची शक्यता तीव्र असते. या घटनेची दखल घेऊन गेली काही वर्षे श्री कृपा एक्वेरियम आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था भटक्या कुत्र्यांवर त्यासोबत मांजरांवर अँटी रेबीज लसीकरणाची मोहीम राबवत आहे. यंदाही आंतरराष्ट्रीय रेबीज जागरूकता दिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि.2) दिवसभर लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.

व्ही.पी.डब्ल्यू.ए. या प्राण्यावर उपचार आणि संशोधन करणार्‍या मान्यवर संस्थेच्या माध्यमातून 400 हून अधिक भटक्या कुत्र्यांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. रेबीज रोग निवारण लस देण्याच्या मोहिमेत श्री कृपा एक्वेरियम-खोपोली, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली एनिमल फीडर ग्रुप, शिवदुर्ग मित्र मंडळ -लोणावळा, स्नेक रेस्क्युअर्स खोपोली तसेच खोपोलीतील विविध प्राणी आणि पक्षी मित्र या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

या मोहिमेला खोपोली नगरपरिषद आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून देखील सहकार्य केले जाणार आहे. खालापूर तालुक्यातील प्राणी तज्ज्ञ डॉ. राहुल मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम संपन्न होणार आहे.

मागील वर्षी खोपोली शहरात संपन्न झालेल्या मोहिमेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. जास्तीत जास्त प्राणीमित्रांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे.

प्रवीण शेंद्रे
श्री कृपा एक्वेरियमचे संचालक
Exit mobile version