वन्यजीव गणनेमध्ये वणव्यांचा अडसर
| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यात वणवेविरोधी अभियान राबविले जात आहे. परंतु, हे अभियान वणवे विझून गेल्यानंतर सुरू होत असल्याने आता तालुका वासियांनी वणवे रोखण्यासाठी अन् विझविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या वर्षा अखेरिस झालेल्या वन्यजीव गणनेमध्ये या वणव्यांचा अडसर निर्माण झाल्याचे वन्यजीवांच्या पावलांच्या ठशांवर तसेच विष्ठेवर जळलेल्या रोपे तसेच झाडांचे अवशेष आल्याने स्पष्ट झाले आहे.
पोलादपूर तालुक्यात मार्गशीर्ष महिन्यापासून सुरू झालेले वणवे वैशाख महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजे तब्बल साडेपाच महिने सुरू राहणार आहेत. त्यानंतरही पारंपरिक शेतीचा एक अविभाज्य भाग म्हणून शेतात जाळले जाणारे तरवे उन्हाची झळ अनुभविण्यास लावणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये सवाद येथे एका गवताची उडवी जळण्याचा तर कापडे फौजदारवाडीसह धामणदिवी, सडे, सवाद, कोतवाल बुद्रुक आणि कोंढवी येथे वाडा जळून गुरे होरपळल्याच्या दूर्घटना घडल्या आहेत. दरम्यान, तालुक्यात संध्याकाळी उंच डोंगरावर विद्युत रोषणाई केल्यासारखे दृश्य मनोहारी दिसत असले तरी हे वणवे मोठ्या प्रमाणात वन संपदेचे नुकसान करतात. हे वणवे भर दुपारी जेव्हा पेटतात तेव्हा पाणी टंचाई असलेल्या या तालुक्यात शेतकऱ्यांना त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते.
पोलादपूर तालुक्यातील माळरानावरील गवताचे प्रमाण पाहता ते तालुक्याला पशुधन संगोपनासाठी दुधदुभता तालुका अशी ओळख देण्यास उपयुक्त आहे. मात्र, दरवर्षी लागणाऱ्या वणव्यांमुळे दाहक अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी येथील डोंगरावर पेटते कापडी बोळे फेकून वणवे लावणाऱ्या दोघा मोटार सायकलस्वारांचा व्हिडीओ सोशल मिडीयावरून व्हायरल झाला होता. तेव्हा हे वणवे कोळसा निर्मितीसाठी लावले जाऊन वणवे विझल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोळसा गोळा करण्यात येत असल्याचे लक्षात आले. मात्र, हे दोघे निसटण्यात यशस्वी झाले होते. गतवर्षी डिसेंबर महिन्यात पोलादपूरच्या 4 हजार हेक्टर वनक्षेत्रामध्ये वन्यजीवगणना सुरू असताना केवळ कोल्हे, साळींदर आणि भेकरीचे अस्तित्वाचे पुसट संकेत प्राप्त झाले आहेत. मात्र, बिबट्यासह अन्य वन्यपशूंचे वनातील वास्तव्य दर्शविणारे विष्ठा, पावलांचे ठसे, अन्य पाळीव प्राण्यांना व झाडांना नखांनी ओरबाडणे असे संकेत वणव्यांमुळे दिसून आले नसल्याचे वनरक्षक आणि वनपालांचे म्हणणे आहे. वणवा प्रतिबंधक सप्ताहाचे आयोजन हे फेब्रुवारी महिन्याच्या 1 ते 7 तारखेपर्यंत केले जात असले तरी तत्पूर्वीच वणव्यांची तीव्रता अधिक असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी आता वणवे विझविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
पोलादपूरकरांनाच पुढाकार घेण्याची गरज
पोलादपूर तालुक्यात वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे वन्यजीवांनी वनक्षेत्रातून पळ काढल्याचे स्पष्ट झाले असताना वनक्षेत्रात वन्य पक्ष्यांचा वणव्याच्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून होरपळून मृत्यू झाल्याच्या तक्रारीदेखील वनक्षेत्राच्या वनपालांकडे गेल्या वर्षी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, घटनास्थळी पाहणी करेपर्यंत वन्यपक्ष्यांचे विशेषत: मोर लांडोरींचे मृतअवशेष भटक्या कुत्र्यांनी भक्ष्य केल्याने दिसून आले नाहीत. पोलादपूर नगरपंचायतीकडे अग्निशमन यंत्रणा नसल्याने आतापर्यंत अनेकदा महाड नगरपरिषद आणि महाड एमआयडीसीतील अग्निशमन यंत्रणांना पाचारण करून वणवे विझविण्यात आले आहेत. त्यामुळे पोलादपूर तालुक्यात अग्निशमन यंत्रणेची गरज ध्वनित झाली असली तरी सध्यातरी पोलादपूरकरांनाच वणवे प्रतिबंधासाठी तसेच विझविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
