कोरोना लसीकरणाआधी अँटीजेन बंधनकारक

| मुरुड | वार्ताहर |
मुरुडमध्ये सोमवारपासून कोरोनाची लस घेण्याआधी लाभार्थींना अँटीजेन टेस्ट करावी लागणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी काढले आहे.

वय 18 ते 44 गटातील लाभार्थींचे लसीकरण सुरू झाल्यापासून लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागली आहे. त्यातच नोंदणी ऑनलाइन असल्याने मुरुड तालुक्याबाहेरील लाभार्थी येथे येऊ लागले. या गर्दीमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या काही नागरिकांकडून लसीकरण केंद्रावरील कर्मचारी तसेच इतर नागरिक यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली, तसेच कोरोनाबाधित व्यक्तीला लस देता येत नाही, यामुळे येथील पॉझिटिव्ह रेट वाढू नये यासाठी सोमवारपासून 18 ते 44 तसेच 45 वर्षांवरील लाभार्थींना लस देण्याआधी त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात येणार असल्याची व डेटा एन्ट्री ऑपरेटरमार्फत टेस्टची नोंद आयसीएमआर पोर्टलवर करण्यात येणार असल्याचे मुरुडमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्या सोनम यांनी सांगितले. तसेच लसीकरण केंद्रावरील गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी मुरुडमधील प्रत्येक आळीतील लाभार्थींना टप्प्या-टप्प्याने बोलावण्यात यावे व लसीकरण केंद्रावर नोंदणी करावी, याबाबत आरोग्य केंद्रामार्फत योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version