अन्वर बुराण यांचे निधन

। पोयनाड । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात सर्वात जुन्या व अग्रगण्य असलेल्या झुंझार युवक मंडळ पोयनाडचे अध्यक्ष अन्वर इस्माईल बुराण यांचे (दि.8) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी दुपारी पोयनाड येथील जामा मशिदीत नमाज पठण करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेत त्यांची प्राणजोत मावळली. मृत्यू समयी त्यांचे वय 69 होते.

झुंझार युवक मंडळ पोयनाड संघांसाठी त्यांनी 1970 ते 80 च्या दशकात कबड्डी खेळाडू म्हणून जिल्हास्तरीय स्पर्धा खेळले आहेत. एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्यांची ओळख संपूर्ण रायगड जिल्ह्यात होती. पुढे त्यांनी झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गेली 30 वर्ष यशस्वीरीत्या पार पाडली. संघटन कौशल्य व समाजातील सर्व वर्गांच्या लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची क्षमता त्यांच्या मध्ये होती. झुंझारच्या क्रीडांगणावर दरवर्षी जिल्हास्तरीय कबड्डी, क्रिकेट लेदर व टेनिस बॉल स्पर्धांचे जिल्हास्तरीय आयोजन करणे तसेच जिल्हास्तरीय कॅरमच्या स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असे. रायगड जिल्ह्यातील युवा खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिले आहे.

Exit mobile version