‘आपला दवाखाना’ बंद होणार?

| माथेरान | वार्ताहर |

राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. याचा असंख्य गरजवंताला लाभ मिळत आहे. वैद्यकीय सुविधासुद्ध ‘आपला दवाखाना’ या माध्यमातून सर्वांना मोफत तपासणी आणि उपचार केले जात आहेत. परंतु, अनेक ठिकाणी ही कल्याणकारी योजना बारगळत चालल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

माथेरान या दुर्गम भागातसुद्धा जिल्हा परिषदेच्या वतीने आपला दवाखाना सुरू आहे. परंतु, काही महिन्यांपूर्वी या दवाखान्यात सोयीसुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्याने नाईलाजाने रुग्णांची आत्मीयतेने सेवा करणार्‍या एमबीबीएस डॉक्टरांना दवाखाना सोडून जाण्याची वेळ आली आहे. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांना जीवदान दिलेल्या डॉ. प्रशांत यादव यांनी शासनाच्या कुचकामी धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत प्रशांत यादव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, शहराच्या मध्यवर्ती भागात आपला दवाखाना असून, या दवाखान्यात पुरेसा औषधांचा साठा नसून साधे पाण्याचे कनेक्शनसुद्धा नाही. औषधांची मागणी केल्यास खूपच कमी प्रमाणात औषधे दिली जातात. महत्त्वाच्या गोळ्या, इंजेक्शने त्याचप्रमाणे रुग्णांना बेड, ड्रेसिंगचे साहित्यसुद्धा उपलब्ध नाही. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आपला दवाखाना असून, काही औषधे मागविली असता कर्जत येथून घेऊन जा, असे सांगण्यात येते. हा वाहतुकीचा खर्च आम्ही स्वतः कसा करणार, हाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकदा येथील नगरपरिषदेच्या दवाखान्यातून दोन महिन्यांची काही औषधे घेतली होती; परंतु आपला दवाखान्यात सर्व मोफत असल्यामुळे बहुतांश सर्वच रुग्ण इकडे धाव घेत असतात. एखाद्या रुग्णाला नगरपरिषदेच्या दवाखान्यात अ‍ॅडमिट केल्यास त्या रुग्णाला औषधे दिली जात नाहीत. मागील काळात आम्ही जवळपास पंचवीस रुग्णांच्या चरबीच्या गाठी काढल्या आहेत. ही कामे करण्यास आम्ही जर का टाळाटाळ केली असती, तर त्या रुग्णाला अन्य ठिकाणी जाऊन उपचार घेणे खूपच खर्चिक बाब होती. आम्ही सेवाभावे काम करत असताना अत्यावश्यक साहित्य दवाखान्यात उपलब्ध होऊ शकत नसेल तर काय काम करणार, त्यामुळे आता इथे राहण्यात काही अर्थ नसल्याचे डॉ. प्रशांत यादव यांनी स्पष्ट केले.

राजकारण्यांना विसर
बाराही महिने राजकारण करणार्‍या येथील राजकीय पक्षाच्या नेत्यांना या दुर्गम गावाविषयी काडीमात्र सहानुभूती दिसत नाही. प्रशांत यादवसारखा अभ्यासू एमबीबीएस डॉक्टर या गावात उपलब्ध असताना त्यांना आपला दवाखान्यात काय काय अडचणी येत आहेत. ज्यांनी कोरोना काळात अनेकांना जीवदान दिले आहे असे डॉक्टर हे गाव सोडून गेले तर गोरगरीब रुग्ण कुठे जाणार? राजकारण बाजूला ठेवून राजकीय पक्षांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन आपला दवाखाना बंद होण्यापासून वाचवणे गरजेचे बनले आहे.
Exit mobile version