निवृत्तीच्या निर्णयावर पुनर्विचाराचे आवाहन

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगटला 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. यासह तिचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते. यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान, हरियाणातील खाप पंचायतींनी चरखी दादरी येथे ‘सर्व खाप महापंचायत’ आयोजित केली होती. या खाप पंचायतींनी विनेश फोगटला कुस्तीतून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

विनेश सोबत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करून तिला न्याय मिळावा, असे सांगवान खापचे प्रमुख सोंबीर सांगवान यांनी सांगितले. त्यांनी कट-कारस्थानारकडेही लक्ष वेधले. विनेश फोगटचे वजन अचानक कसे वाढले? तिच्यासोबत अनेक लोक होते. तिचे वजन वाढू नये याची काळजी घेणे ही त्यांची जबाबदारी होती, असे ते म्हणाले आहेत. खाप पंचायतींच्या मागण्या मांडत सांगवान म्हणाले की, विनेशच्या कामगिरीचा विचार करून तिला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केले जावे.

Exit mobile version