| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पशुधनाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक ताण कमी व्हावा आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने जिल्ह्यात पशुधन विमा कवच योजना राबविण्यात येत आहे. भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत ही पशुधन विमा योजना प्रभावीपणे अंमलात आणली जात असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 107 शेतकऱ्यांनी पशुधन विमा कवचाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत पशुधन विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय समन्वयक आकाश हवालदार यांनी केले आहे.
भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विविध शासकीय योजना तसेच वैयक्तिक पशुधन विमा प्रस्तावांद्वारे पशुपालकांना विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. बँक कर्ज योजनेंतर्गत माणगाव तालुक्यात नऊ, तर श्रीवर्धन तालुक्यात पाच असे एकूण 14 प्रस्ताव पूर्ण झाले आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 20 प्रस्ताव पूर्ण करण्यात आले आहेत. तर, प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेत महाड तालुक्यात 19, माणगावमध्ये सहा आणि खालापूरमध्ये 11 असे एकूण 36 प्रस्ताव पूर्ण करण्यात आले आहेत.
याशिवाय वैयक्तिक पशुधन विमा अंतर्गत 37 प्रस्ताव पूर्ण झाले आहेत. एमएच बंडल केलेले (शेळी व मेंढी) अंतर्गत एकूण 32 प्रस्तावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळत असून, पशुधनाच्या नुकसानीमुळे होणारा आर्थिक धोका कमी करण्यास मोठी मदत होत आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विमा प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत. भविष्यातही अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पशुधन विमा योजना पोहोचवून त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले जाणार असल्याचे कोकण विभागीय समन्वयक आकाश हवालदार आणि रायगड जिल्हा प्रतिनिधी राहुल लाडगे यांनी सांगितले.
यावेळी सतीश इंद्रे, जय धारिया, गणेश सुरते, स्वप्नील पवार, अनिल तांडेल, पल्लवी कदम, प्रद्युम्न ढोबळे, आप्पासाहेब घोडके, रोहन सरकटे, आकांशा माळी, अनुज पाटील, संग्राम ओंबळे आदी मान्यवर उपस्थित होते.







