मतदान जनजागृतीसाठी बेलोशीच्या ग्रामसेवकाची संकल्पना
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी मतदान जनजागृती करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील बेलोशीचे ग्रामसेवक शैलेश नाईक यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. त्यांनी मतदान केंद्राच्या परिसरात व गावागावात मतदान करण्याचे फलक लावून ‘मतदानासाठी वेळ काढा, आपआपली जबाबदारी पार पाडा’, असे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यातील बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत महाजने, बेलोशी, वावे, मल्याण, घोटवडे, वळवली या गावांसह दिवीवाडी, बौध्दवाडी, मठवाडी, पाटवाडी, सागवाडी आदी वाड्यांचा समावेश आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले असून वेगवेगळे उपक्रम राबवून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बेलोशी येथील ग्रामसेवक शैलेश नाईक यांनी गावागावात व मतदान केंद्रापासून काही अंतरावर कागदी फलक लावले आहेत. त्यावर मतदान करण्याचे आवाहन करून त्यांनी मतदान जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ग्रामसेवकांनी केलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.
वरिष्ठांच्या सुचनेनुसार मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा, तसेच मतदानाचे महत्व मतदारांपर्यंत पोहचविण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे.
– शैलेश नाईक, ग्रामविकास अधिकारी, बेलोशी ग्रामपंचायत