। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदारसंघात परहूर ग्रामपंचायत हद्दीतील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची सभा शनिवारी (दि.16) जांभूळपाडा येथील वसंत नारायण पाटील यांच्या घरी संपन्न झाली. यावेळी सभेला संबोधित करताना महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी सांगितले की, विरोधी पक्षातले नेते व कार्यकर्ते दारू मटणाची आमिष दाखवून मतदारांना भुलवत आहेत. दारुमुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. अशा या समाजकंटकांना घरी बसवा आणि आपले संसार वाचावा, असे आवाहन चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी महिलांना संबोधताना केले आहे.
या सभेच्या निमित्ताने परहूर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण पंचायत विभागात बाईक रॅली काढत ताईंच्या विजयाचे रणशिंग फुंकले होते. तसेच, चिऊताईंना भरघोस मताधिक्याने निवडून आणू, असे आश्वासनदेखील कार्यकर्त्यांनी दिले.यावेळी काँग्रेस नेते सुनील थळे, चंद्रकांत मोकल, शिवसेना प्रवक्ते धंनजय गुरव, शेकापचे अॅड. गौतम पाटील, माजी सरपंच जनार्दन घरत, विनोद खोपकर, प्रकाश पाटील, तुषार नाईक, अक्षय पाटील, परेश गुंजाळ, विकास पाटील, चंद्रकांत पाटील, शेखर पाशीलकर, रवींद्र घोगले, शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे सदस्य निलेश घरत आदी उपस्थित होते. या सभेचे नियोजन ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील आणी जांभूळपाडा ग्रामस्थांनी केले होते.