ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने पथकांची नियुक्ती

अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोविड विषाणु ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने तालुक्यातील प्रत्येक गावनिहाय तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली असून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी बॅनर्स, घंटा गाडीवरील उद्घोषणा याव्दारे तालुक्यामध्ये जनजागृती निर्माण करण्यात येत असल्याची माहिती तहसिलदार तथा इंसिडेंट कमांडर मीनल दळवी यांनी दिली.
अलिबाग तहसिलदार  मीनल दळवी यांनी अलिबाग तालुक्यामधील हॉटेल रिसॉर्ट, लॉज, कॉटेज व्यावसायीकांच्या संघटनांचे अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष, भाजी/फळ विक्रेते अध्यक्ष, अलिबाग रास्त भाव धान्य दुकानदार अध्यक्ष, तसेच रिक्षा, टॅक्सी, पी. एन. पी., मालदार, अजंठा, एम 2 एम फेरी बोट अध्यक्ष व अलिबाग आगार आगार व्यवस्थापक, यांची कोव्हिड 19, विषाणू ओमिक्रॉन विषाणू बाबत माहिती देण्याकरिता तहसिलदार अलिबाग यांच्या दालनात सभा घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
सभेमध्ये तहसिलदार, अलिबाग यांनी कोव्हिड-19 विषाणू व ओमिक्रॉन बाबत माहिती दिली. मदत व पुनर्वसन विभाग, यांचे आदेश दिनांक 27 नोव्हें. 2021 व जिल्हाधिकारी  यांच्या आदेशाबाबत माहिती दिली. तदनंतर तहसिलदार यांनी उपाययोजना व शास्ती याबाबत माहिती देवून सभेमध्ये आलेल्या विविध संघटनांच्या अध्यक्षांना आपापल्या स्तरावर कोव्हिड-19, ओमिक्रॉन बाबत जनजागृती करणेबाबत तसेच मास्कचा व सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर राखणे, साबणाने हात धूणे, परिसर स्वच्छ राखणे, इ.बाबत संबंधितांना माहिती देऊन कोव्हिड -19 विषाणूचा प्रसार रोखण्याबाबत अवाहन केले. 

Exit mobile version