यूपीएससी उत्तीर्ण प्रशांत भोजने यांचा सत्कार

। पाली । वार्ताहर ।

यूपीएसी परीक्षेचा अभ्यास करीत असताना तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर थोर समाजसुधारक महापुरुषांचे वाचन करुन अभ्यास करण्याची एकाग्रता व आवड निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रशांत सुरेश भोजने यांनी केले. भेरव येथील सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

ठाणे येथील नागसेन नगर सारख्या कामगार वसाहतीत राहून यूपीएससी परीक्षा प्रशांत भोजने यांनी उत्तीर्ण करुन आई वडिलांचे स्वप्न साकार केले. यासाठी प्रशांतने नऊ वर्ष मेहनत घेऊन तासनतास अभ्यास केला. त्यामुळे यूपीएससी सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले. यासाठी प्रशांतच्या आई-वडीलांनी प्रचंड मेहनत घेऊन कोणत्याही गोष्टींची कमी पडू दिली नाही. या घवघवीत यशाबद्दल प्रशांत भोजने यांचे विविध संस्था, राजकीय पक्ष व आंबेडकरी जनतेकडून सत्कार करण्यात येत आहेत. त्यातच सुधागड तालुक्यात देखील वाघोशी ग्रामपंचायत व आदर्श नगर भेरव यांच्यावतीने उपसरपंच दिपक पवार यांच्या भेरव येथील संविधान या निवासस्थानी प्रशांत भोजने यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. पुढे मार्गदर्शन करताना प्रशांत म्हणाले, जीवनात काही बनायचे असेल तर फक्त दहावी, बारावी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत मर्यादित राहू नका, तर त्यापुढे शिका. एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा द्या. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालत असलेली बार्टी ही संस्था आपल्याला स्कॉलरशिप देते त्याचा फायदा घेण्याचे आवाहन देखील प्रशांत भोजने यांनी यावेळी केले.

Exit mobile version