| पनवेल | प्रतिनिधी |
हत्या करून गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी फरीदाबाद येथून अटक केली. न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 6 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुकापूर येथे वेल्डिंगचा व्यवसाय करणाऱ्या रियाजुद्दीन शेख (वय 58) यांची कुंदन कुमार ब्रिज किशोर गिरी (रा. बिहार) याने हत्या करून तो नेपाळमध्ये पसार झाला होता. पोलीस त्याचा एक वर्षापासून शोध घेत होते. मात्र तो सापडत नसल्याने पोलिसांसमोर आरोपीला अटक करण्याचे आव्हान होते. आरोपी हा फरिदाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पथक फरीदाबाद येथे गेले.
गुन्ह्यातील आरोपी कुंदन कुमार ब्रिज किशोर गिरी याला ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान, पोलीस उपयुक्त परिमंडळ-2 चे पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी खांदेश्वर पोलीस पथकाचे अभिनंदन केले.