रायगडात पाच रोप-वे प्रकल्पांना मंजुरी

पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना; पर्यटन विकासाला मोठी गती

| रायगड | प्रतिनिधी |

पर्यटन जिल्हा म्हणून देश-विदेशात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रायगडच्या पर्यटन विकासाला आता नवे पंख मिळणार आहेत. ऐतिहासिक गड-किल्ले, जागतिक वारसा स्थळे, धार्मिक केंद्रे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांना अधिक सुलभपणे जोडण्यासाठी राज्य शासनाने रायगड जिल्ह्यातील पाच महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार असून, पर्यटनासोबतच स्थानिक रोजगार, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे.

राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या प्रकल्पांमध्ये घारापुरी (एलिफंटा) लेणी, अलिबाग समुद्रकिनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, रायगड किल्ल्याचा पायथा ते रायगड किल्ला आणि श्रीक्षेत्र कनकेश्वर डोंगर या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाचा समन्वय साधणारे हे प्रकल्प रायगडच्या पर्यटन क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे मानले जात आहे.

केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत राज्यातील डोंगराळ आणि दुर्गम पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी 45 हून अधिक रोप-वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यापैकी 16 प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून, तर उर्वरित 29 प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत. रायगडमधील पाच प्रकल्पांना मिळालेली मंजुरी ही जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी मानली जात आहे.

अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून कुलाबा किल्ल्यापर्यंत रोप-वे सुरू झाल्यास भरती-ओहोटीवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. पर्यटकांना वर्षभर सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून गडावर जाणाऱ्या रोप-वेमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसह सर्व पर्यटकांसाठी गडदर्शन अधिक सुलभ होणार आहे.

नेरळ-माथेरान रोप-वे प्रकल्पामुळे माथेरानपर्यंतचा प्रवास कमी वेळात आणि अधिक आरामदायी होईल. श्रीक्षेत्र कनकेश्वरसाठीचा रोप-वे धार्मिक पर्यटनाला नवी चालना देईल, तर घारापुरी (एलिफंटा) लेणीपर्यंतच्या रोप-वेमुळे जागतिक वारसा स्थळाला भेट देणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पांच्या अंमलबजावणीनंतर पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याबरोबरच हॉटेल व्यवसाय, वाहतूक, स्थानिक बाजारपेठा, हस्तकला आणि अन्य सेवा क्षेत्रांनाही मोठी चालना मिळणार आहे. पर्यटनाशी संबंधित उद्योगांना नवे बळ मिळाल्याने स्थानिक अर्थव्यवस्था अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रकल्पांच्या पुढील टप्प्यात सविस्तर आराखडा, पर्यावरणीय मंजुरी, तांत्रिक प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. या निर्णयाचे पर्यटन व्यावसायिक, स्थानिक नागरिक आणि पर्यटनप्रेमींनी स्वागत केले असून, रायगडच्या पर्यटन विकासाच्या इतिहासात हे प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरतील, असा आशावाद व्यक्त होत आहे.

श्रीक्षेत्र कनकेश्वर (अलिबाग) धार्मिक पर्यटनाला नवी चालना.
घारापुरी (एलिफंटा) लेणी जागतिक वारसा स्थळापर्यंत जलद आणि सुलभ पोहोच.
अलिबाग समुद्रकिनारा-कुलाबा किल्ला- भरती-ओहोटीवर अवलंबित्व कमी; वर्षभर सुरक्षित प्रवास.
नेरळ- माथेरान पर्यटकांसाठी जलद, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवास.
रायगड किल्ल्याचा पायथा-रायगड किल्ला-ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसाठी मोठा दिलासा.
Exit mobile version