महाड औद्योगिक वसाहतीमधील काँक्रिटीकरण कामाला मंजुरी

| महाड | प्रतिनिधी |

ऐन पावसाळ्यात औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांना खड्डे पडले असून, वारंवार ये-जा करणारी अवजड वाहने यावरून जात असल्याने खड्ड्यांमध्ये छोट्या वाहनांचे नुकसान होत आहे. या रस्त्याच्या डांबरी कामासाठी लाखो रुपये मंजूर झाले होते. मात्र, उशिराने शहाणपण सुचलेल्या प्रशासनाने काँक्रिटीकरण कामाची मागणी केली आणि त्यानंतर या कामाला मंजुरी मिळाली. मात्र, कामाला प्रारंभ न झाल्याने सध्या हा रस्ता खड्डेमय झाला आहे.

महाड एमआयडीसीमधील रस्त्यांवर कायम रासायनिक कंपन्याचा माल घेऊन येणार्‍या अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. शिवाय नागरिकांची वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांचीदेखील वर्दळ कायम असते. नांगलवाडी ते बिरवाडी हा रस्ता महाड औद्यागिक विकास महामंडळ यांच्या ताब्यात आहे. देखभाल दुरुस्तीवर प्रतिवर्षी यावर लाखो रुपये खर्च होतो. मात्र, या पावसाळ्यात या रस्त्यांवर एक वीत आत जाईल असे खड्डे पडले आहेत. याठिकाणी असलेल्या कारखान्यांचा माल घेऊन येणारी वाहने ही कित्येक टन वजनाची असतात. या क्षमतेचा रस्ता मात्र बनवलेला नाही. यामुळे या रस्त्यावर आता खड्डेच खड्डे पडले आहेत.

सन 2016-17 मध्ये महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर सुमारे 1 कोटीच्या वर खर्च करण्यात आला आहे तर सन 2017-18 मध्येदेखील जवळपास 80 लक्ष इतका खर्च पडला आहे. अंतर्गत रस्ते दुरुस्ती आणि इतर कामे जैसे थे ठेवून ठेकेदार पैसे उकळतात. मातीने भरले जाणारे खड्डे अवजड वाहनाच्या वजनाने काही तासातच जैसे थे स्थितीत येतात. एमएमए हॉस्पिटलसमोरून खड्ड्यांच्या माळेला सुरुवात होते. सुदर्शन केमिकल समोर तर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सुदर्शन केमिकलपासून थेट प्रीव्ही कंपनीपर्यंत बरेच खड्डे पडले आहेत. आपटे ऑरगॅनिकच्या समोरील आणि मागील बाजूस असलेला रस्ता पूर्ण बाद झाला आहे. अनेक ठिकाणी अंतर्गत मार्गावर मोर्‍या खचल्या आहेत. कोप्राणपासून पुढे गेल्यावर एक्वा फार्मपर्यंतदेखील रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. महाड आसनपोई ते बिरवाडी हा मार्गदेखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असून, या मार्गाचीदेखील सध्या बिकट अवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.

नांगलवाडीपासून चार किमी अंतराच्या कामाला सन 2023 मध्ये औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली होती. सुमारे अकरा कोटी रुपये याकरिता मंजूर झाले होते. खडीकरण, डांबरीकरण आणि रुंदीकरण अशा स्वरूपाचे काम मंजूर झाले होते, मात्र औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहनांची क्षमता पाहिल्यानंतर त्या क्षमतेचे रस्ते असणे आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली. या मागणीचा विचार करून औद्योगिक विकास महामंडळाने काँक्रिटीकरण कामाला मंजुरी दिली. मात्र, ही मंजुरी पावसाळ्याच्या तोंडावर मिळाल्याने रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. मार्च 2023 मध्ये या कामाला मंजुरी मिळाली. या काँक्रिटीकरण कामासाठी सुमारे 93 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या डांबरी रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत.

Exit mobile version