वन्यजीव सुरक्षितता-संवर्धन कृती आराखड्यास मान्यता

आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
। मुंबई । वृत्तसंस्था ।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणार्‍या ङ्गराज्य वन्यजीव कृती आराखड्याफस मान्यता देण्यात आली आहे. सन 2021 ते 2030 या दहा वर्षांच्या काळाकरिता हा कृती आराखडा तयार करण्यात आला असून असा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, आमदार धीरज देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, या आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून वन विभागात जलद कृती दलाची स्थापना करणे व त्यासाठी अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचारार्थ पाठवण्याच्या सूचनाही दिल्या. आराखड्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे पाहण्यासाठी नियंत्रण समितीची स्थापना करावी, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

Exit mobile version