। नांदेड । प्रतिनिधी ।
नांदेडचे ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचे निधन झालं आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे वसंत चव्हाण हे खासदार होते. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा रक्तदाब कमी झाला अन् श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नांदेडच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नसल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
दरम्यान, हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये वसंत चव्हाण यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 13 ऑगस्टपासून उपचार सुरु होते. ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र, अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.