एलएइएस शाळा व्यवस्थापन वठणीवर

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे मान्य
वेणगाव | वार्ताहर |
नेरळ येथील एलएइएस शाळेने शेकडो विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवलेले होते. यासंदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागला होता. या प्रकरणाची दखल सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीतर्फे घेेेऊन शिक्षण अधिकारी यांना या शाळेची मान्यता रद्द करा, असे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाच्या दणक्याने एलएइएस शाळा व्यवस्थापन हादरले असून, त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे मान्य केले आहे.
सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले होते की, नेरळ येथील एलएइएस शाळेने शेकडो विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे.
निवेदनाची दखल घेत कर्जतचे बीडीओ बालाजी पुरी यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे यांनीसुद्धा दखल घेत संबंधित शाळेला तातडीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात यावे, असे आदेश दिले. शेवटी एलएइएस शाळेच्या प्रिन्सिपल नायर यांनी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण ग्रुपवर सुरू केल्याचे लेखी पत्र दिले. यावेळेस सम्यक विद्यार्थी आंदोलनचे अ‍ॅॅड. कैलास मोरे, वंचित बहुजन आघाडीचे हरिश्‍चंद्र यादव, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, नेरळ शहर अध्यक्ष मुकेश गायकवाड, अशोक कदम, जगदीश गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

Exit mobile version