म्हसळ्यातील चार गावांना नळजोडण्यासाठी 2 कोटी 39 लाखांचा निधी
। म्हसळा । उदय कळस ।
जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीच्या माध्यमातून पाणी पोहोचविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मुख्य हेतू आहे. ‘जलजीवन’ अंतर्गत म्हसळ्यातील चार गावांना नळजोडण्यांसाठी 2 कोटी 39 लाख 1 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, हजारो महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरणार आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जल जीवन मिशन योजनेसाठी 45 टक्के केंद्र शासन, 45 टक्के राज्य शासन व 10 टक्के स्थानिक लोकवर्गणी असे आर्थिक नियोजन असते. सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागांत 1 कोटी 42 लाख 36 हजार नळजोडण्या देण्याचे केंद्र व राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.
म्हसळा तालुक्यातील केलेटे ग्रामपंचायतीमधील चंदनवाडी वाडीसाठी बोअरवेल, थ्री एचपी पंप व नळजोडणी यासाठी 21 लाख रुपये मंजूर आहेत. मांदाटणे योजनेमध्ये मांदाटणे, पाष्टी, पानदरे, मोरवणे ही चार गावे मोडत असून, मुख्यत्वे विहीर, पंपिंग आणि पाणी लिफ्ट साठवण व वितरण हे समाविष्ट आहे. त्यासाठी 97 लाख 28 हजार मंजूर आहेत. साळविंडा या योजनेत तीनही वाड्यांना गुरुत्ववाहिनीने पाणीपुरवठा, बंधारा, कलेक्टींग चेंबर, साठवण टाकी हे समाविष्ट असून, 97 लाख 64 हजार मंजूर आहेत. तोराडी योजनेमध्ये विहीर, पंप साठवण टाकी या गोष्टी समाविष्ट असून, 23 लाख 18 हजार मंजूर आहेत.
चार गावांसाठी 2 कोटी 39 लाखांचा निधी
चंदनवाडी (21 लाख), मांदाटणे (97.28 लाख), साळविंडा (97.64 लाख), तोराडी (23.18 लाख) असे 2 कोटी 39 लाख 1 हजाराची मंजुरी व कार्यादेश प्राप्त केले आसल्याचे ग्रा.पा. पुरवठा विभागाचे प्र. उपअभियंता युवराज गांगुर्डे यांनी सांगितले.
प्रशासकीय मान्यताप्राप्त योजना
1) सोनधर 2) कुडगाव.
अंदाजपत्रक सादर झालेल्या योजना
1) खारगाव (बु), 2) ठाकरोली, 3) भेकर्याचा कोंड, 4) चिचोडा.
तालुक्यातील 13 गावांतील योजनांचे सर्वेक्षण पूर्ण
2024 पर्यंत नळजोडण्यांचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर अंमलबजावणी काम सुरु आहे. तालुक्यातील 13 गावांतील योजनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत उद्दिष्ट मोठे असले तरी काम पूर्ण करायचे आहे, असे निर्देश पालकमंत्री अदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आणि जि.प. सीईओ डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.