मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कामात मनमानीपणा

रस्ता खोदून ठेवलाय, नळ तोडल्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी धावपळ
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील जितें ग्रामपंचायतमधील बोर्ले ते कुंभे या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केले जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी जितें गावातील रस्ता खोदून ठेवला असून 15 दिवसानंतर देखील तेथे कोणतेही काम केले जात नाही. दरम्यान,त्या रस्त्याच्या खोदकामामुळे तेथील जलवाहिन्या तुटल्या असून स्थानिक ग्रामस्थांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.तर ठेकेदार कंपनी स्थानिक ग्रामस्थांचे काही ऐकून घेत नसल्याने त्यांची मनमानी रस्त्याच्या काम सुरू झाल्यापासून डिसेंबर महिन्यापासून सुरू आहे.
जितें ग्रामपंचायत मधील कुंभे-जितें-बोर्ले या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले होते. त्या रस्त्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आले त्यावेळी बोर्ले येथील पेशवाई रस्ता खोदून ठेवला होता. तेथे पाईप मोरी टाकण्यासाठी तब्बल दीड महिना रस्ता बंद ठेवला होता. स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठविल्यावर योजनेचे अधिकारी यांच्या रेट्यामुळे रस्त्याचे काम सुरू झाले. या रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने 15 दिवसांपूर्वी खोदकाम करून ठेवले आहे. त्यावर खडी टाकून ते काम तसेच असून 15 दिवसांपासून स्थानिक ग्रामस्थांना त्या खडी दगडावरून वाट काढावी लागत आहे.
दुसरीकडे रस्त्याचे काम करताना ठेकेदार कंपनीने जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदकाम केले.त्यावेळी जलवाहिन्या तुटल्या असून त्या जलवाहिन्यामधून दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यात वाहून चालले आहे. मात्र त्यानंतर जलवाहिन्या तोडणारा ठेकेदार स्थानिक ग्रामस्थांवर अरेरावी करीत असून जलवाहिन्या 15 दिवसापासून तशाच आहेत. तोडलेल्या जलवाहिन्या जोडून देण्याचे काम ठेकेदाराने असताना स्थानिक ग्रामस्थांना तुम्ही पाईप आणून द्या नाहीतर असेच ठेवून देईल अशी धमकी देखील संबंधित याच भागातील रहिवाशी असलेला ठेकेदार देत आहे.पाण्याच्या जलवाहिन्या तोडल्यामुळे ज्यांचे नळ कनेक्शन आहेत,त्यांची धावपळ होत आहे. दुसरीकडे त्या सर्वांच्या घरापर्यंत पाणी येत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांची पाणी घरी आणण्यासाठी धावपळ होत आहे.त्यामुळे रहिवाशांनी आपल्या नळ जोडण्या आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

आमच्याकडे पाण्याच्या जलवाहिन्या यांची समस्या ग्रामस्थांनी पोहचविली असून त्या जलवाहिन्या तात्काळ दुरुस्त करून देण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.तर रस्त्याचे काम एवढे दिवस खोदकाम केल्यानंतर खडी टाकून ठेवले आहे,त्याबद्दल खातेनिहाय जाब विचारला जाईल. – राहुल चौरे, उपअभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

Exit mobile version