प्रवाशाकडून जास्तीचे भाडे आकारणी; पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पर्यावरणपूरक ई-रिक्षांचा पायलट प्रकल्प चालविला जात आहे. या प्रकल्पातील कन्हैया खेर या ई-रिक्षाचालकाने एका वृद्ध आणि आजारी नागरिकाला प्रवासी वाहतूक देताना 35 रुपये प्रवासी भाडे आकारण्याऐवजी 150 रुपये भाडे आकारल्याची तक्रार समाज माध्यमांकडून समोर आली होती. दरम्यान, त्या तक्रारीवरून कन्हैया खेर यास 48 तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेकडून दिले आहेत.
माथेरानमध्ये सद्यःस्थितीत 20 ई-रिक्षांना प्रयोगिक तत्त्वावर रिक्षा चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, क्रमांक एकची हातरिक्षा असलेले हातरिक्षा चालक कन्हैया खेर यांनी आपल्या ई रिक्षामधून माथेरान हुतात्मा चौक ते दस्तुरी स्टॅन्डपर्यंत एका ज्येष्ठ आणि आजारी व्यक्तीला प्रवासी वाहतूक करून नेले. मात्र, त्यांच्याकडून 35 रुपये माणसी भाडे आकारण्याऐवजी तब्बल 150 रुपये भाडे आकारले. त्याबाबत स्थानिक युट्यूब वाहिनीवरून संबंधित विषयाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर माथेरान नगरपरिषदेने समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या वृत्ताची दखल घेऊन खात्री केली आणि नंतर ई रिक्षा चालक कन्हैया खेर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबतचा लेखी खुलासाही नोटीस मिळाल्यापासून 48 तासांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. आपला खुलासा अपात्र असल्यास किंवा असमाधानकारक असल्यास आपल्याविरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची गंभीर नोंद घेण्यात यावी, असे पत्र माथेरान पालिकेचे वतीने मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिले आहे.