बोगस बियाण्यांमुळे भातपीक वाया; शेकडो शेतकर्यांवर उपासमारीचे वेळ
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आपटवणे येथील शेकडो शेतकरी संकटात सापडलेत. अस्मानी संकटाचा सामना करणार्या शेतकर्यांना आता बियाण्यात झालेल्या फसवणुकीने रडकुंडीला आणले आहे. बोगस बियाण्यांमुळे शेतकर्यांची वर्षभराची मेहनत मातीमोल झाली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत तात्काळ पंचनामे करुन शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबतची हकीकत अशी की, येथील शेतकर्यांनी पाली येथील कृषी सेवा केंद्रामधून जया भात बियाणे खरेदी केले. मात्र, 90 टक्क्यांपेक्षा जास्त बियाणे खेड, काळी कचरी, भेळ असल्यामुळे या पिकाला भाव मिळणार नाही. मोठ्या कष्टाने आणि खर्चाने केलेली लागवड मोठ्या नुकसानीत गेली. हाता तोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. शेतकर्यांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे. तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केलीय. तर, कृषी सेवा केंद्राची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
सुधागड कृषी मित्र संघटनेचे पदाधिकारी शरद गोळे म्हणाले, दरवर्षी शेतकरी वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रातून भात बियाणे घेतो, 2024 च्या मोसमात येथील शेतकर्यांनी जे बियाणे घेतले, ते बियाणे लागवडीच्या तीन महिन्यांनंतर पीक लोंबीवर आलं. मात्र, या शेतीत 99 टक्के पिकावर खेड आली आहे, त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व शेतकर्यांवर अस्मानी संकट ओढावले असून, आता ओला दुष्काळदेखील आला आहे. यातच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, शासनाने जलद पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी अन्यथा येत्या काळात उग्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
वैशाली केदारी म्हणाल्या आम्ही सर्व शेतकरी आहोत, आमचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर आहे, आम्ही वर्षभर जे काही तुटपुंजी साठवतो, तीच शेती लागवडीत टाकतो. मात्र, आता बियाण्यात फसवणूक झाली आहे, सर्व पीक वाया गेले, आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने आम्हाला जलद नुकसानभरपाई द्यावी. शेतकरी भरत दंत म्हणाले की, माझ्या कुटुंबाचे सर्व उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे. आता वर्षभर मेहनत करून खर्च करून आता जे बियाणे आम्हाला दिले त्यात फसवणूक झाली. त्यामुळे सर्व शेतकर्यांवर मोठे संकट आले. कृषी सेवा केंद्रातील बियाणे ज्यांनी घेतले, त्या शेतकर्यांची मोठी फसवणूक झालीय, याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी.असे दंत म्हणाले.
यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शरद गोळे, शेतकरी विलास दंत, वसंत दंत, भरत दंत, राजाराम दंत, कृष्णा दंत, राम भोईर, हरिश्चंद्र भोईर, महादेव चोरगे, राम महाडिक, चिंतामण दंत, तुकाराम दंत, दयाराम दंत, राजाराम दंत, लक्ष्मण भोईर,ज्ञानेश्वर जाधव, पांडुरंग दंत, लक्ष्मण महाडीक, गणेश भोईर, पांडुरंग दंत, संतोष दंत,शेखर यावेळी विलास दंत, वसंत दंत, भरत दंत, राजाराम दंत, कृष्णा दंत, राम भोईर, हरिश्चन्द्र भोईर, महादेव चोरगे, राम महाडीक, चिंतामण दंत, तुकाराम दंत, दयाराम दंत, राजाराम दंत, लक्ष्मण भोईर, ज्ञानेश्वर जाधव, पांडुरंग दंत, लक्ष्मण महाडीक, गणेश भोईर, पांडुरंग दंत, संतोष दंत, शंकर दंत, जीवन दंत, वैशाली केदारी, सुनंदा जाधव, सुनीता मोरे, सुरेखा जाधव, बशीर परबलकर, श्री. पांगारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.