श्रीवर्धनमधील नागरीकांना त्रास
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन आगारात लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसाठी आगारात कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या खासगी बसेस सोडण्यात येतात. आगारातून पहाटेच्या वेळी मुंबई,सातारा, लातूर या बसेस श्रीवर्धन गावात फेरी घेत आपल्या मार्गावर मार्गस्थ होतात. तसेच, त्याच बसेसने सायंकाळी परतीच्या वेळी गावात फेरी घेऊन आगाराकडे जातील, असा नियम आहे. परंतु, या खासगी बसेस वरील चालक व वाहक हे बस गावात नेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने त्याचा त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे.
श्रीवर्धन आगारात रात्रीच्या वेळी लातूर, सातारा व मुंबई येथून लांब पल्ल्याच्या बसेस येतात. येथील प्रवाशांची रात्रीच्या वेळी गैरसोय होऊ नये म्हणून एसटी बसेस श्रीवर्धन गावातून आगारात जातात. सध्या नालासोपारा, भाईंदर, बोरीवली या मार्गावर श्रीवर्धन आगाराच्या कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या खासगी बसेस सोडण्यात येतात. या मार्गावर चालक व वाहकाच्या मर्जीतील हॉटेलमधे बस नाष्टा व जेवणासाठी थांबवण्यात येते. परंतु, या हॉटेलमध्ये सुलभ शौचालय व स्वच्छता गृहाची वानवा असल्यामुळे प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच, परतीच्या मार्गात रात्रीच्या सुमारास खासगी बसेसने श्रीवर्धन गावातून फेरी मारत मगच आगारात जाण्याची नियमावली आहे. परंतु, या खासगी बसेस वरील चालक व वाहक हे बस गावात नेण्यासाठी टाळाटाळ करतात. बस नियोजित वेळेपेक्षा उशिरा श्रीवर्धन बसस्थानकाजवळ आली असता प्रवासी वर्गाला स्थानकाजवळ उतरवले जाते. त्यात अनेक वेळा ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गाचा समावेश असतो. बस गावात फेरी करीता नेण्यासाठी प्रवासी वर्गाने आग्रह केला असता प्रवासी वर्गाला चालक व वाहकाकडून अपमानास्पद वागणूक देण्यात येते. त्यामुळे गावातून फेरी आणि चालक-वाहकाच्या मर्जीतील हॉटेल या बाबतीत श्रीवर्धन आगाराकडून नियमावली लागू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.







