सोनोग्राफी तंत्रज्ञ सुहास ढेकणेंची मनमानी; सिव्हीलमध्ये गोंधळ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अनेक समस्यांमुळे चर्चेत असलेले अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा सोनोग्राफी तंत्रज्ञ सुहास ढेकणे यांच्या मनमानी कारभारामुळे चर्चेत आले आहे. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात त्यामुळे चांगलाच गोंधळ माजला होता. सकाळपासून सोनोग्राफीसाठी आलेल्या गर्भवती महिलांसह इतर रुग्णांना सोनोग्राफीसाठी ताटकळत ठेवल्याने त्यांची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याकडे करण्यासाठी गेलेल्या रुग्णांनी तीव्र संताप व्यक्त केला. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माने यांनी सुहास ढेकणे यांना समज देत रुग्णांना शांत करण्यात आले. सुहास ढेकणे त्यांच्या दालनातून बाहेर आल्यानंतरही आपला हेका सोडण्यास तयार नव्हते.

जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव तर कधी डॉक्टर नाही, मशिनरी आहे तर तंज्ञत्र नाही अशा परिस्थितीमुळे जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातूर उपचारासाठी येणार्‍या गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होतात. गेले अनेक दिवस तंत्रज्ञाच्या रजेमुळे जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी विभागच बंद होता. त्यामुळे रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना खासगी सोनोग्राफी केंद्रात जाऊन आर्थिक भूर्दंड सोसावा लागला.

नुकतेच सोनोग्राफी तंत्रज्ञ सुहास ढेकणे रजा संपवून सेवेत रुजू झाल्याने बंद असलेला सोनोग्राफी विभाग सुरु करण्यात आला. सकाळी 8-9 वाजल्यापासून सोनोग्राफीसाठी येऊन वाट पहात असलेल्या गर्भवती महिलांना दुपारी 2 वाजले तरी सोनोग्राफीच होत नसल्याने उपासमार सहन करावी लागली. याबाबत काही रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांनी तंत्रज्ञ सुहास ढेकणे यांना जाब विचारताच त्यांनी माझ्या जेवणाची वेळ झाली आहे. मी नंतर करेन. तुम्हाला थांबायचे असेल तर थांबा नाहीतर घरी जा, असे उत्तर दिले. त्यामुळे सकाळपासून तासन्तास थांबलेल्या रुग्ण महिला तसेच नातेवाईकांचा संतापाचा पारा चढला.

या प्रकाराची तक्रार करण्यासाठी सर्वजण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या दालनात गेले. तेथे त्यांनी आपली तक्रार सांगताच डॉ. सुहास माने यांनी त्यांच्याकडून लेखी तक्रारीची मागणी करीत तात्काळ सोनोग्राफी तंत्रज्ञ सुहास ढेकणे यांना आपल्या दालनात पाचारण केले. सुहास ढेकणे यांना समज देत रुग्णसेवा करण्याचे सांगितले. अन्यथा तात्काळ कार्यमुक्त करण्याचा इशारा दिला. मात्र दालनाबाहेर येताच सुहास ढेकणे यांनी पुन्हा आपला हेका कायम ठेवत माझ्या वेळेनुसार मी सोनोग्राफी करणार तुम्हाला थांबायचे असेल तर थांबा, अशी उत्तरे देत आपला मनमानी कारभार सुरुच ठेवला.

दुपारपर्यंत केवळ 2 ते 3 सोनोग्राफी
सोनोग्राफी विभागात चौकशी केली असता तेथे असलेल्या परिचारीकेडून सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत अवघ्या दोन ते तीनच सोनोग्राफी झाल्याचे समोर आले. रुग्णांबरोबर गैरवर्तन करुन मनमानी करणार्‍या सोनोग्राफी तज्ज्ञ सुहास ढेकणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रुग्णांमधून केली जात आहे.

Exit mobile version