गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय; शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
| कर्जत | प्रतिनिधी |
तालुक्यातील गुरुचरण जमिनी, देवस्थानाच्या जमिनी यात मोठा काळाबाजार सुरू आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमिनीचे दावे चालतात. मात्र, यात गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय देण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी तक्रारी केल्या, मात्र त्यावर निर्णय न झाल्याने आता शेतकरी थेट धरणे आंदोलनाला बसले आहेत. याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई लढणार असल्याचेदेखील ठाकरे यांनी सांगितले आहे.
तालुक्यामधील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमीन महसूल व भाडेपट्टा अधिनियमानुसार महसूल व भाडेपट्टाची अपिले चालतात. सदर अपिले अधिनियमातील तरतुदीनुसार चालत नसून, राजकीय व आर्थिक हेवेदावे असल्याने चालत आहेत. या माध्यमातून वर्षानुवर्षे जमीन कसत असणाऱ्या खेडोपाड्यातील गोरगरीब शेतकऱ्यांवर अधिनियमातील तरतुदीचा मनमानी पद्धतीने वापर करून उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या माध्यमातून अन्याय होत आहे. याबाबत ठोस निकाल जनतेच्या हितासाठी येणे गरजेचे असून, अर्ध न्यायिक अधिकार असणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांस लगाम लागणे आवश्यक आहे. याबाबत शासनाकडे महसुली प्रकरणाचे निकाल तपासणे व अन्य मागण्यांसाठी पत्रव्यवहार केला असून, राजकीय दबाव व वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने कारवाई होत नसल्याने दि.20 रोजी बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. किरण ठाकरे यांच्याबरोबर भगवान डोंगरे, मारुती साळोखे, शंकर थोरवे, शांताराम बडेकर या शेतकऱ्यांसह रमेश अहिर, रमेश रसाळ, रामा शेडगे, सविता गावंडा, छाया बांगरा, पंतू निरगुडा, निलेश पिंपरकर आदी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
उपविभागीय अधिकारी कर्जत नैराळे यांची आतापर्यंतच्या जमीन प्रकरणातील निकाली काढलेल्या प्रकरणाची मेरिटनुसार चौकशी व्हावी, संबंधित अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या माध्यमातून फौजदारी चौकशी व्हावी, कर्जत तालुक्यातील जमीन हस्तांतरण प्रकरणांची चौकशी होत आहे तोपर्यंत शिस्त व अपील अधिनियमानुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. कर्जत तालुक्यातील जमीन प्रकरणामध्ये मोठा काळाबाजार करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आपण सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार असून, तिथे न्यायासाठी दाद मागणार असल्याचे भाजपचे ॲड. हृषीकेश जोशी यांनी सांगितले आहे. माजी नगराध्यक्ष राजेश लाड, कृष्णा जाधव, संजय कराळे, आत्माराम पवार, राजेश ठाणगे, विशाल कोकरे आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला.
आपण आजवर दिलेले निर्णय हे न्यायाला धरून दिलेले आहेत. जे प्रोटोकॉल आहेत, त्याप्रमाणे आपण काम केले आहे. त्यामुळे एखाद्या प्रकरणात निर्णय मान्य नसल्यास त्या व्यक्तीला पुढे अपील करण्याची मुभा आहे.
अजित नैराळे, उपविभागीय अधिकारी, कर्जत