आदिवासी कातकरी समाजाचा घेराव
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांनी आदिवासी कातकरी समाजाचा पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय हिरावून घेण्यासाठी जुन्या सरकारी परिपत्रकाचा आधार घेऊन मनमानी सुरू केली आहे. त्यांनी महाड व पोलादपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे मासेमारीचे ठेके नूतनीकरण करण्याऐवजी रद्द केले आहेत. यामुळे संतप्त आदिवासी कातकरी बांधवांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे रायगड जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांना शुक्रवारी (दि.27) घेराव घातला होता.
महाड व पोलादपूर तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजाचा पारंपारिक व्यवसाय मासेमारी आहे. या समाजबांधवांना शासनाने मासेमारी हक्कासाठी तलाव ठेक्याने दिलेले होते. यंदा जूनमध्ये त्यांचे मासेमारी हक्काचा ठेका मुदत संपल्याने ठेक्यांचे नुतनीकरण करण्यासाठी आदिवासी बांधवानी प्रस्ताव संबंधित कार्यालयात सादर केले. मात्र, त्यावर गेल्या 4 महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही न केल्याने आदिवासी बांधवांनी तलाव ठेक्याची लिखित स्वरुपात मागणी केली होती. मात्र, ते देता येणार नाहीत असे उत्तर देत तलावातून जुन्या सरकारी परिपत्रकानुसार मत्स्योत्पादन घेतले जात नसल्याने ठेके रद्द होत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे रायगड जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी सांगितले. तसेच, माझ्या हातात काहीच नाही अशी उडवा उडवीची उत्तरे देखील जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी दिली होती. त्यामुळे त्यांना घेराव घालत शुक्रवारी याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी सर्वश्री देवपूर व खडपी माजी सरपंच दिपक साबळे, पोलादपूर येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्या. जोगेश्वरी गाडीतळचे चेअरमन काशिनाथ पवार, कातकरी आदिवासी आधार संघटना पोलादपूर अध्यक्ष पांडुरंग वाघे, रायगड आदिवासी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था कोथुर्डेचे गोविंद हिलम, चापगाव-महाडचे माजी सरपंच पांडू नथू काटकर, कोथुर्डेचे ग्रा.पंचायत सदस्य किसन सिताराम पवार, खैरे आदिवासी मच्छिमार वि.का.सहकारी संस्था मर्या.चे चेअरमन मिथुन मुकणे,जननीदेवी आदि. मच्छिमार वि.का. सह. संस्था मर्या. आंबवडेचे चेअरमन अशोक मुकणे, आदिवासी कातकरी मच्छिमार वि.का. सह.संस्था मर्या. वरंधचे चेअरमन चंद्रकांत निकम हे 5 सहकारी संस्थांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.