| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यात ग्रामसेवकांची मुजोरगिरी वाढली असून त्याचा त्रास ग्रामस्थांना होताना दिसत आहेत. पाटणोलीमध्ये ग्रामसेवकच सरकारी कामापेक्षा खाजगी कामातच दंग असल्याने ग्रामस्थांना विविध कामांसाठी खोळंबून रहावे लागत असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पाटणोली ग्रामपंचायतीमध्ये झाला असून एक नागरिक आपला तक्रारी अर्ज घेउन दोन दिवस ग्रामपंचायतीमध्ये जात होता. परंतू, ग्रामसेवक जागेवर नसल्याने शिपाई तो अर्ज घेण्यास तयार नव्हता. मात्र, स्थानिक सदस्यांनी अर्ज दिल्यानंतर शिपायाने तो अर्ज घेतला परंतू ग्रामसेवक हजर नसल्याने तक्रारी अर्जावर ज्या पध्दतीने कारवाई व्हायला हवी होती ती कारवाई झाली नाही.
पाटणोली ग्रामपंचायतीमध्ये सहा ते सात वर्ष कृष्णा पाटील हा ग्रामसेवक असून त्यांच्या अनेक वेळेला मनमानी कारभार समोर आला आहे. वरिष्ठांकडे कोणीही तक्रार करायला तयार नव्हते शेवटी प्रस्तुत प्रतिनिधीन विस्तार अधिकारी विक्रांती तांडेल यांच्याकडे तक्रार करुन सदरील ग्रामसेवक रजेवर आहे का ? अशी विचारणा केली परंतू त्यांनी चौकशी करुन सांगितले की, टपालामध्ये रजेचा अर्ज नाही. त्यानंतर पाटणोली व्यतिरिक्त इतर कोणत्या ग्रामपंचायतीचा कार्यभार आहे का? अशी विचारणा केली असता विस्तार अधिकार्यांनी कोणत्याही इतर ग्रामपंचायतीचा कार्यभार नसल्याचे सांगितले. महत्त्वाची बाब म्हणजे शासन नियमानुसार ग्रामसेवकांना मुख्यालयात राहणे गरजेचे असताना ग्रामसेवक मुख्यालयात राहत ही नाहीत तसेच स्वतः चा भ्रमंती ध्वनी बंद करुन आपल्या वैयक्तिक समारंभामध्ये ही मंडळी मश्गुल असल्याचे दिसून येते, अशी तक्रार ग्रामस्थांनी केलेली आहे.
या विषयी पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांच्याकडे देखील विचारणा केली असता त्यांनी सर्व माहिती घेउन सांगतो व त्या नंतर त्यांनी पुर्ण माहिती घेतली असता ग्रामसेवक कृष्णा पाटील याने रजा घेतली नसल्याचे सांगून त्यांना कारणे दाखवा नोटीस त्वरीत दिली जाईल असे सांगितले.