तालुक्यात आरोग्य सेवांची मनमानी; ‘आरोग्य रॅकेट’वर मुंडेंचा हातोडा कधी?
| उरण | प्रतिनिधी |
राज्यातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि माजलेल्या अधिकाऱ्यांना धडा शिकविणारे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा धाक अनेक विभागांवर बसला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, अनेकांच्या फायली उघडल्या गेल्या आहेत. परंतु, उरणमध्ये मात्र काही दवाखाने, मेडिकल आणि पॅथॉलॉजी केंद्रांचा माज प्रचंड वाढला आहे. त्यांनी कायदा, नियम आणि शासन यांना तिलांजलीच दिली असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे उरणमधील ‘आरोग्य रॅकेट’वर मुंडेंचा हातोडा कधी पडणार, असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे.
उरणमधून रुग्ण आजाराने त्रस्त होऊन दवाखान्यात जातो आणि बाहेर पडताना मात्र बिलाचा आकडा पाहून दुसऱ्यांदा आजारी पडतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उरणमध्ये आरोग्यसेवेच्या नावाखाली रुग्णांच्या खिशावर दरोडा टाकला जात आहे का, हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या तोंडी आला आहे. तसेच, तालुक्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याची चर्चा देखील वर्षानुवर्षे सुरू आहे. काही ठिकाणी वैद्यकीय पात्रता, नोंदणी आणि परवान्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. येथील मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. काही ठिकाणी रुग्णाला थेट विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्यासाठी भाग पाडले जाते. तसेच, पॅथॉलॉजी केंद्रांचा कारभार तर आणखी गंभीर असल्याची चर्चा आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, अनेक दवाखाने निवासी इमारतींमध्येच थाटले गेल्याची चर्चा आहे. त्याठिकाणी सोसायटीची परवानगी, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, रुग्णांसाठी सुरक्षित प्रवेश, आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्याची व्यवस्था या सर्वांची तपासणी कोणी केली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी तर रुग्णांना दाखल करण्यासाठी बनवलेल्या खोल्या पाहिल्यानंतर हे दवाखाने आहेत की कोंबड्यांची खुराडी, असा प्रश्न पडतो. येथील खाटा एकमेकांना चिकटलेल्या, स्वच्छतेचा बोजवारा, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफचा अभाव आणि अवाढव्य बिले हा अनेक ठिकाणचा वास्तव असल्याचे बोलले जात आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, काही दवाखाने आणि मेडिकल यांच्यातील कथित साटेलोट्याची चर्चा सुरु आहे. डॉक्टर स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर मेडिकल चालवतात का? रुग्णांना विशिष्ट ठिकाणीच औषधे घेण्यास भाग पाडले जाते का? औषधांच्या किंमतींमध्ये फरक का असतो? अशी प्रश्ने स्थानिकांमधून उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रकारांवर प्रसारमाध्यमांनी वारंवार प्रकाशझोत टाकला आहे. स्थानिक नागरिकांनी देखील तक्रारी केल्य आहेत. मात्र, संबंधित शासकीय यंत्रणा मात्र शांतता पाळून आहे. ही शांतता निष्क्रियतेची आहे की आर्थिक साटेलोट्याची, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
त्यामुळे आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणांना हे सर्व दिसत असूनही याकडे जाणीपूर्वक डोळेझाक केली जात आहे. या ठिकाणी पैशांचा व्यवहार आणि रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया उरणकरांमधून उमटत आहेत. दरम्यान, आयुक्त तुकराम मुंडे यांनीउरणमध्ये एकदा धाड टाकवी. या ठिकाणी आरोग्यसेवेच्या नावाखाली नेमके कोणाचे उखळ पांढरे होत आहेत आणि रुग्णसेवेच्या नावाखाली कशी पैशांची लूट होत आहे, हे वास्तव सर्वसामान्यांसमोर येईल. अशी प्रतिक्रीया उरणकरांमधून उमटत आहे.
अचानक मोहीम राबविण्याची मागणी
नुकतेच आयुक्त तुकाराम मुंडे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना कोणत्याही मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करताच काही मंडळींच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्याची चर्चा आहे. कारण अनेक वर्षे सुरू असलेल्या कथित आर्थिक साखळ्यांवर हा निर्णय घाव ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उरणमधील दवाखाने, मेडिकल आणि पॅथॉलॉजी केंद्रांवर अचानक संयुक्त तपासणी मोहीम राबविली तर अनेक धक्कादायक प्रकार बाहेर येतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.
