ग्रामपंचायत सदस्या सिध्दीता चुनेकर यांचा आरोप
| अलिबाग | प्रतिनिधी |
बोर्ली येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात न घेता बोर्लीच्या शिंदे गटातील सरपंच आपल्या मर्जीने कारभार चालवत असल्याचा आरोप सदस्या सिध्दीता चुनेकर यांनी केला आहे. त्यामुळे सरपंच सपना जायपाटील यांच्या विरोधात चुनेकर यांनी आक्रमक भुमिका घेऊन सरपंच यांना अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार बोर्लीत कांदळवन समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये जाणीवपूर्वक बदल करून पदाचा गैरवापर करून अन्य व्यक्तींची नावे समितीमध्ये समाविष्ट केली आहेत. प्रतिज्ञापत्र घेऊन असेसमेंट उतारा व कर आकारणी करुन देण्याचा ठराव मंजूर असताना सुध्दा सरपंच यांनी नियम डावलून नोटरी घेऊन बाहेरील धनदांडग्यांना असेसमेंट उतारा दिला. मात्र स्थानिकांनी असेसमेंट उताऱ्यासाठी नोटरी लावून अर्ज केला असता, त्यांना प्रतिज्ञापत्र करण्यास सांगून त्यांची अडवणूक केल्याचा आरोप सिध्दीता चुनेकर यांनी केला आहे. तसेच मासिक सभेत आदिवासी समाजासाठी जातीचे दाखले व योजनांसाठी महत्वाचा विषय असतानादेखील या समाजातील प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांना सभेचा अजेंडा देण्यात आला नाही. त्यामुळे शासकीय योजनांपासून आदिवासी समाज वंचित राहण्यास सरपंच जबाबदार आहे. वेगवेगळी कामे मासिक सभेच्या इतिवृत्तात नसतानादेखील वेगवेगळी कामे स्वतःच्या मर्जीने घेऊन मनमानी कारभार केल्याचा आरोप चुनेकर यांनी केला आहे.
त्यांच्या या कारभाराविरोधात सदस्या सिध्दीता चुनेकर यांनी आवाज उठविला असून याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांना पदावरून काढण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही चुनेकर यांनी दिला आहे.
बोर्ली येथील सरपंच विरोधात आलेला तक्रार अर्ज बघून लवकरच त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला जाईल. त्यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
डॉ. भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद