नांदगावमधील प्रवाशांना बस थांबत नसल्याची तक्रार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुरूड आगारातून सुटणाऱ्या एसटी बसेस नांदगावमध्ये थांबा घेत नसल्याची तक्रार वाढत आहे. त्याचा त्रास महिला प्रवाशांसह विद्यार्थी यांना होत आहे. मुरूड आगाराच्या मनमानी कारभाराबाबत प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. एसटी महामंडळ विभागातील जिल्ह्याचे विभाग नियंत्रक चौरे यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
मुरूड हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण असून, लाखोच्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येतात. मुरूडमधून नोकरी व्यवसायाबरोबरच शिक्षणासाठी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्यादेखील प्रचंड आहे. त्यामुळे एसटीतून प्रवास करण्यावर प्रवासी भर देतात. परंतु, मुरूड आगारातून सुटणारी एसटी बस नांदगाव स्थानकाजवळ थांबा घेत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. सायंकाळच्या वेळेला घरी जाणाऱ्या विद्यार्थीनींना तसेच नोकरी व्यवसायानिमित्त आलेल्या अन्य प्रवाशांना नांदगावमध्ये ताटकळत राहवे लागत आहे. याबाबत अनेक वेळा स्थानिकांनी आगार व्यवस्थापक राहूल शिंदे यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे. सोमवारी सायंकाळी सायंकाळी दोन तास नांदगाव स्थानकाजवळ प्रवासी विशेष करुन विद्यार्थीनी उभ्या होत्या. परंतु, मुरूडची एकही एसटी बस थांबली नाही. त्यामुळे मुरूड आगाराच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुरूडमधील नांदगांवमध्ये बस थांबली नाही,तर आगामी काळात मुरूड आगारावर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेकाप मुरूड पुरोगामी युवक संघटना उपाध्यक्ष ॲड.मनिष माळी यांनी दिला आहे.
