अर्जेंटिनाची उपांत्य फेरीत धडक

| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |

गतविजेत्या अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाने शुक्रवारी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या लढतीत इक्वेडोर संघावर 4-2 असा विजय मिळवला आणि कोपा अमेरिका या स्पर्धेचे जेतेपद राखण्याच्या दिशेने पाऊल टाकले. महान खेळाडू लिओनेल मेस्सीला पेनल्टीवर गोल करता आला नाही; मात्र गोलरक्षक इमिलियानो मार्टिनेझ याने अँजेल मेना व ॲलन मिंडा या खेळाडूंचे आव्हान लीलया परतवून लावत अर्जेंटिनाला दिमाखदार विजय मिळवून दिला. त्याआधी निर्धारित वेळेमध्ये अर्जेंटिना – इक्वेडोर यांच्यामध्ये 1-1 अशी बरोबरी झाली होती.

लिओनेल मेस्सी याने दुखापतीमुळे पेरूविरुद्धच्या लढतीमधून माघार घेतली होती. त्यामुळे इक्वेडोरविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते; पण मेस्सी या लढतीत खेळला. याचसोबत त्याने इतिहास रचला. कोपा अमेरिका स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक मिनिटे मैदानावर खेळणारा तो पहिल्या क्रमांकाचा फुटबॉलपटू ठरला, हे विशेष उभय देशांमधील लढतीच्या सुरुवातीला अर्जेंटिनाचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून येत होते. मात्र गोल करण्याची पहिली संधी इक्वेडोरला मिळाली. जेरेमी सारमेंटो या इक्वेडोरच्या खेळाडूने मारलेला फटका इमिलियानो मार्टिनेझ परतवून लावला व प्रतिस्पर्ध्यांना आघाडी घेण्यापासून दूर ठेवले. त्यानंतर 35व्या मिनिटाला लिसांड्रो मार्टिनेझ याने अर्जेंटिनासाठी गोल केला आणि आघाडी मिळवून दिली.

मार्टिनेझचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय गोल ठरला. उत्तरार्धात केव्हीन रॉड्रिगेझ याने इक्वेडोरसाठी गोल करीत 1-1 अशी बरोबरी साधली. क्रॉसबारला लागून फुटबॉल उडालाकोपा अमेरिका या फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीमध्ये जादा वेळेचा अवलंब करण्यात येणार नाही. निर्धारित वेळेमध्ये बरोबरी झाल्यानंतर थेट पेनल्टी शूटआऊट होणार आहे. अंतिम फेरीमध्ये मात्र जादा वेळ असणार आहे. अर्जेंटिना – इक्वेडोरमध्ये 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटवरून विजेता ठरवण्यात आला. या शूटआऊटमध्ये लिओनेल मेस्सी पहिल्या क्रमांकावर किक मारायला आला. डाव्या बाजूने त्याने मारलेली किक अपयशी ठरली. त्याने मारलेला फुटबॉल क्रॉसबारला लागून वर उडाला. अफलातून बचावलिओनेल मेस्सीला अर्जेंटिनाला आघाडी मिळवून देता आली नाही; पण गोलरक्षक इमिलियानो मार्टिनेझ याने देशासाठी संस्मरणीय कामगिरी केली. त्याने सुरुवातीला अँजेल मेना याने मारलेला फटका स्वत:च्या डाव्या बाजूला सूर मारत समर्थपणे थोपवून मारला. त्यानंतर ॲलन मिंडाकडून आलेले आव्हान स्वत:च्या उजव्या बाजूला झेप घेत मोडून काढले. डाव्या हाताने फुटबॉलला गोलजाळ्याच्या बाहेर फेकून देणारा क्षण अफलातून होता. त्यानंतर ज्युलियन अल्वारेझ, मॅक ॲलिस्टर, गोंझालो मोंटीएल व निकोलस ओटामेंडी यांनी अर्जेंटिनासाठी दमदार गोल केले. इक्वेडोरकडून जॉन एबो व जॉर्डी सेईसेडो यांनाच गोल करता आले. लिओनेल मेस्सी कर्णधार आहे. गोल करण्याचा विश्वास असल्यामुळेच तो पहिल्यांदा गोल करायला आला. पेनल्टीवर त्याला गोल करता आला नाही. फुटबॉलमध्ये अशा घटना घडतात. तसेच आम्हाला गोलरक्षक इमिलियानो मार्टिनेझ याच्यावर कमालीचा विश्वास आहे. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटमध्ये आम्ही निर्धास्त असतो.- लिओनेल स्कॅलोनी, मुख्य प्रशिक्षक, अर्जेंटिना.

Exit mobile version