दीपक, हुसामुद्दीन, निशांतचे पदक पक्के
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दीपक भोरिया, मोहम्मद हुसामुद्दीन व निशांत देव या भारताच्या बॉक्सर्संनी बुधवारी प्रतिस्पर्ध्यांना बॉक्सिंगच्या रिंगणात दमदार पंचेस मारत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील पदक पक्के केले. आता त्यांना किमान ब्राँझपदक पटकावता येणार आहे. जागतिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक तीन पदके निश्चित करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 2019 मध्ये भारताने अमित पांघल व मनीष कौशिक यांनी पदके जिंकली होती. पहिल्या लढतीत दीपक भोरिया याने 51 किलो वजनी गटात किर्गीस्तानच्या दीयुशेबेव नुरझीगीत याचा 5-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्याच्यासमोर उपांत्य फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या बी. बेन्नामा याचे आव्हान असणार आहे.
मोहम्मद हुसामुद्दीन याने 57 किलो वजनी गटात बुल्गेरियाच्या जे. डियाज इल्बानेज याचे कडवे आव्हान 4-3 असे परतवून लावत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. दोन खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. पहिल्या फेरीत हुसामुद्दीन याला प्रतिस्पर्ध्याचा खेळाचा अंदाज घेता आला नाही, पण दुसर्या फेरीत हुसामुद्दीन याने झोकात पुनरागमन केले. अखेरच्या फेरीत हुसामुद्दीन याने संयम व आक्रमण याचा योग्य मिलाफ करीत विजयावर मोहोर उमटवली.
निशांत देव याने भारताचे तिसरे पदक पक्के केले. त्याने 71 किलो वजनी गटात क्युबाच्या जॉर्ज क्युलर याच्यावर 5-0 असा दणदणीत विजय साकारला. निशांतसमोर जास्त उंची असलेल्या खेळाडूचे आव्हान होते, पण निशांतने शानदार पंचेसच्या जोरावर ही लढत आपल्या नावावर केली. निशांतला उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या अस्लानबेक सामबर्गेनोव याचा सामना करावयाचा आहे.
जागतिक स्पर्धेतील पदकवीर
भारताच्या दीपक भोरिया, मोहम्मद हुसामुद्दीन व निशांत देव या तीन बॉक्सर्संनी यंदा ताश्कंद येथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये पदक पक्के केले आहे. त्याआधी भारताच्या सात बॉक्सर्संनी जागतिक या मानाच्या स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याची किमया करून दाखवली आहे. 2009 मध्ये विजेंदर सिंग याने ब्राँझपदक पटकावले होते. 2011 मध्ये विकास क्रिशन याने ब्राँझपदकाला गवसणी घातली होती. 2015 मध्ये शिव थापा याने ब्राँझपदक जिंकले. 2017 मध्ये गौरव बिधुरी याने आणि 2019 मध्ये मनीष कौशिक याने ब्राँझपदकाला गवसणी घातली होती. 2019 मध्येच अमित पांघालला रौप्यपदक जिंकता आले होते.