सवतींमध्ये भांडण, गुन्हा दाखल

| महाड | प्रतिनिधी |

घटस्फोटीत पहिल्या पत्नीने दुसर्‍या पत्नीच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करून तेथील सामानाची व वस्तूची मोडतोड करून धमकी दिल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी आणि आरोपी या एकमेकींच्या सवत असून, आरोपी या फिर्यादी यांच्या पतीच्या पूर्वाश्रमीच्या घटस्फोटीत पत्नी आहेत. फिर्यादी मनीषा रामजी गुप्ता (56), रा. नांगलवाडी महाड या बिरवाडी येथील पॅनरोमा केम पेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्ट पदावर आहेत. बुधवारी (दि. 11) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी अर्चना रामजी गुप्ता यांनी फिर्यादी यांच्या कंपनीमध्ये विनापरवानगी जबरदस्तीने प्रवेश करून आवारातील सिक्युरिटी केबिनच्या काचा फोडल्या, कर्मचारीवर्गास शिवीगाळ केली तसेच काम बंद करण्यास सांगून कंपनी जाळून टाकण्याची धमकी दिली.

याप्रकरणी मनीषा गुप्ता यांनी अर्चना गुप्ता यांच्याविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून, त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी अर्चना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून भारतीय न्याय संहिता कलमांनुसार कारवाई केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version