। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या अलिबागच्या दांपत्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. देवीचे दर्शन घेऊन मोटारसायकलने अलिबागला परतणारे प्रशांत तांडेल आणि त्यांची पत्नी घरी न पोहोचल्याने सुरू करण्यात आलेल्या शोधमोहिमे दरम्यान दोघांचेही मृतदेह सायमाळजवळ धनगरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर आढळून आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तांडेल हे पत्नीसह एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन मोटारसायकलने पेणच्या दिशेने अलिबाग येथे जात असताना ते घरी पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी चौकशी सुरू केली. त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले असता शिंग्रोबा मंदिर ते सायमाळ, खोपोलीदरम्यान लोकेशन दिसून आले. यानंतर संबंधित परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. या शोधमोहिमे दरम्यान सायमाळजवळ धनगरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर दोघांचेही मृतदेह आढळले. घटनास्थळी त्यांची मोटारसायकलही अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू असून, अपघात नेमका कसा घडला, याचा तपास केला जात आहे.







