नगराध्यक्षपदी गीता पालरेचा विराजमान; आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मिरवणुकीसह जल्लोष
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गीता पालरेचा यांना मिळाला आहे. बुधवार, दि. 9 रोजी शिवसेनेचे सचिन जवके यांनी नगराध्यक्षपदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे गीता पालरेचा यांचा एकच अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे गीता पालरेचा या बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या आहेत. गुरुवारी (दि.10) रोजी अधिकृत घोषणा होऊन गीता पालरेचा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तर, उपनगराध्यक्षपदी शेकापचे आरिफ मणियार यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंखे व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
विशेष सभा संपन्न झाल्यानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर घोषणा देत जल्लोष केला. त्यानंतर सर्वजण बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गेले. नंतर शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणूक काढण्यात आली. नवनियुक्त नगराध्यक्षपदी गीता पालरेचा व उपनगराध्यक्षपदी आरिफ मणियार यांची निवड होताच शेकापचे सरचिटणीस आ. आ. जयंत पाटील, खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, माजी आ. धैर्यशील पाटील, शेकाप नेते जि.प. सदस्य सुरेश खैरे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शेकाप आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.
यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणूकप्रसंगी आ. अनिकेत तटकरे, माजी आ. धैर्यशील पाटील, शेकाप नेते सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष गीता पालरेचा, राष्ट्रवादी सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, ग.रा. म्हात्रे, माजी सभापती साक्षी दिघे, राष्ट्रवादी सुधागड तालुका महिला अध्यक्षा रुपाली भणगे, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर, शेकाप पाली शहर अध्यक्ष जनार्दन जोशी, प्रियांका पालरेचा, सुधीर साखरले, युवक जिल्हाध्यक्ष आरिफ मणियार, राकेश शिंदे, संजोग शेठ ,पप्पू परबलकर, सुनिल गायकवाड, प्रकाश आवासकर, विठ्ठल सिंदकर, शशिकांत पाशीलकर, संतोष धाटवकर, आरिफ मणियार, सुधीर साखरले आदींसह शेकाप व राष्ट्रवादी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







