। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमिअर लीग 2025 मध्ये अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. हे दोघंही युवा फलंदाज भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याच्या तालमीत तयार झाले आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन यानेही युवराजकडून प्रशिक्षण घ्यावे आणि तो आगामी ख्रिस गेल बनेल, असा दावा युवीचे वडील योगराज सिंग यांनी केला आहे.
भारताचे माजी खेळाडू योगराज हे त्यांच्या विधानाने नेहमीच चर्चेत असतात. आधी त्यांनी अर्जुनला माझ्या हाताखाली शिकायला लावा, त्याला चांगला क्रिकेटपटू बनवतो, असे म्हटले होते. आता त्यांनीच अर्जुलना युवराजच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला आहे. अर्जुनने मुंबई संघ सोडून गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे आणि गोव्याकडून पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतकही झळकावले होते. अर्जुनकडे आक्रमक खेळ करण्याची क्षमता आहे, त्याला युवराजचे मार्गदर्शन मिळाल्यास तो पुढचा ख्रिस गेल बनू शकतो. गेलने टी-20 क्रिकेटमध्ये युनिव्हर्स बॉस म्हणून स्वतःची ओळख तयार केली आहे. युवराजने अर्जुनला प्रशिक्षण दिल्यास तो क्रिकेटचे मैदान गाजवू शकतो, असा विश्वास योगराज यांना आहे.