अर्जुन तेंडुलकरने 4 चेंडूत 3 गडी केले बाद

| मुंबई | प्रतिनिधी |

एकीकडे विश्वचषकाचा थरार भारतात रंगला आहे, तर दुसरीकडे भारतात देशांतर्गत क्रिकेटही सुरू झाली आहे. भारतात खेळल्या जाणाऱ्या देशांतर्गत टी-ट्वेन्टीच्या सय्यद मुश्ताक ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. सोमवारी स्पर्धेचा पहिला दिवस होता आणि अनेक सामने खेळल्या गेले. यामध्ये आंध्र आणि गोवा यांच्यात रांचीमध्ये सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना गोव्याने 20 षटकांत 6 विकेट गमावून 232 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तरात आंध्रनेही चांगली सुरुवात केली, परंतु अर्जुन तेंडुलकरने या सामन्यात आपल्या घातक गोलंदाजीने खळबळ उडवून दिली आणि गोव्याला पहिला विजय मिळवून दिला.क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो.

या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने शेवटच्या षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याने 17व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रिकी भुईला बाद केले. त्यानंतर सामना पूर्णपणे गोव्याच्या हातात आला. आणि 19व्या षटकात अर्जुनने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर गाडी बाद करीत संघाला विजय मिळवून दिला. म्हणजे अर्जुनने शेवटच्या 4 चेंडूत तीन विकेट घेतल्या. अर्जुन तेंडुलकरने आपल्या देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात मुंबईतून केली होती, पण त्याला मुंबई संघाकडून संधी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने 2022-23 च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामापूर्वी संघ बदलला आणि गोव्याच्या संघात सामील झाला. गेल्या वर्षीही अर्जुनने गोव्यासाठी काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती.अर्जुन तेंडुलकरला 2021 च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्या संघासह 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत समाविष्ट केले होते. 2023 च्या आयपीएल लिलावापूर्वी मुंबईने अर्जुन तेंडुलकरला सोडले होते, लिलावात 30 लाख रुपये देऊन त्याला आपल्या संघात समाविष्ट केले होते. अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त 4 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने फलंदाजीत केवळ 13 धावा केल्या आहेत तर गोलंदाजीत 3 विकेट्स घेतल्या आहेत.

Exit mobile version