चाकूचा धाक दाखवून पाच तोळे सोने अन् दोन लाखांची रोकड लंपास
| उरण | प्रतिनिधी |
उलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाण गावात पहाटे सशस्त्र दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. 18) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये रोख असा लाखोंचा ऐवज लंपास केला.
गव्हाण गावातील शेवंताबाई धाया कोळी (53) यांच्या घरात चार अनोळखी चोरटे घुसले. घरातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत धमकावल्यानंतर चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन पोबारा केला. पहाटेच्या वेळी घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवत दरोडा पडल्याने गव्हाण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरट्यांच्या या धाडसी कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच उलवा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, चारही अनोळखी आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. पहाटेच्या वेळी घरात घुसून दरोडा टाकणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी तातडीने छडा लावून आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
