| उत्तरकाशी | वृत्तसंस्था |
उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्याचा भाग कोसळून अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी दोन आठवड्यांनंतरही अथक संघर्ष सुरू आहे. आता लष्कराची ‘मद्रास सॅपर्स’ ही अभियंता तुकडीही घटनास्थळी दाखल झाली असून मजुरांना वाचवण्यासाठी मदत करणार आहे.
बोगद्यात 41 मजूर अडकून पडल्याच्या घटनेला दोन आठवड्यांचा कालावधी झाला आहे. बचाव व मदत कार्यात अनेक अडथळे उभे राहत आहेत. बोगद्यात कोसळलेल्या ढिगाऱ्यात अमेरिकी ऑगर हे यंत्र अडकून बसल्याने नवे आव्हान उभे राहिले. या यंत्राचे ढिगाऱ्यात अडकलेले भाग काढण्यासाठी हैदराबादवरून हवाईमार्गे प्लाझमा कटर आणण्यात आले.
बोगद्यात मजुरांच्या सुटकेसाठी पाईप टाकून मार्ग तयार करण्यात येत असून ढिगाऱ्यात अडकलेले अमेरिकी यंत्र पूर्णपणे मोकळे केल्याशिवाय हे काम पुढे सरकणार नाही. दरम्यान, या बचावकार्यात वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने टेकडीवरून लंबरेषेत खोदकाम करण्यासाठीही यंत्र टेकडीवर पाठविण्यात आले आहे. या बचाव मोहिमेला उशीर लागत असला तरी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी मात्र आतापर्यंतच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मजुरांच्या सुटकेला आणखी काही दिवस किंवा काही आठवडेही लागू शकतात.