कर्जत प्रेस असोसिएशनची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
महसूल विभागाचे कर्जत तहसील कार्यालय आणि उप विभागीय अधिकारी तसेच महसूल विभागाची कार्यालय आता नवीन प्रशासकीय भवन येथे सुरू झाले आहे. प्रशासकीय भवन उभारण्यासाठी शासनाने तब्बल 15 कोटी खर्च केले आहेत. मात्र या तीन मजली इमारतीमध्ये दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला यांना पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात आले नाहीत. तसेच या इमारतीमध्ये उद्वाहन यांची देखील व्यवस्था केलेली नाही. दरम्यान, दिव्यांग व्यक्ती यांना विविध कार्यालयात पोहचण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. याबद्दल कर्जत प्रेस असोसिएशनकडून पत्र देवून मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालय ब्रिटिश काळापासून टेकडीवर होती. जुन्या महसूल कचेरी वरील संपूर्ण कारभार कर्जत शहरात उभारलेल्या नवीन प्रशासकीय भवन येथे 27 मे पासून सुरू झालेला आहे. तसेच प्रांत कार्यालयाचा कारभारसुद्धा याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर होत आहे. या प्रशासकीय भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सात जानेवारी रोजी झाले होते. या उद्घाटन सोहळ्यात अद्ययावत प्रशासकीय भवन सर्व सुविधांनी युक्त असल्याचा उल्लेख केला होता.
या इमारतीत पहिल्या मजल्यावरील तहसीलदार आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रांत यांच्या दरबारी महसुली खटले आणि विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी अपंग व्यक्तींना जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. प्रशासकीय भवन येथे उद्वाहन बसवणे आवश्यक होते. अथवा जिन्याच्या बाजूने रॅम्प करणे गरजेचे होते. कर्जत शहरात असलेल्या नगरपरिषदेच्या दोन मजली इमारतीमध्ये उद्वाहन उपलब्ध आहेत.
तालुक्यातील दिव्यांगांची ही समस्या लक्षात घेऊन कर्जत प्रेस असोसिएशनने प्रांताधिकारी अजित नैराळे यांना निवेदन दिले आहे. अपंगासाठी रॅम्प अथवा लिफ्टची व्यवस्था असणे गरजेचे आहे. यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन यांच्याकडून निवेदन देत तत्काळ रॅम्प बसवून घेण्याचे आणि लिफ्ट बसवून घेण्याची मागणी केली आहे.