अग्निशस्त्र बाळगणारा गजाआड

| पनवेल | वार्ताहर |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी बेकायदेशीर अग्निशस्त्र खरेदी-विक्रीविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सीबीडी पोलिसांनी बुधवारी (दि. 10) सेक्टर-15 मधून गावठी कट्टा, पिस्तूल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक केली आहे. त्यांनी ही शस्त्रे कुठून तसेच कशासाठी आणली होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बेकायदेशीर अग्निशस्त्र, दारूगोळा बाळगणार्‍यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. याच अनुषंगाने बुधवारी सकाळी सीबीडी सेक्टर-15 मधील चावला कॉम्प्लेक्स इमारतीसमोरील भागात सीबीडी पोलिसांनी सापळा लावला होता. यावेळी निरंजन देशमुख (31) व सुरेशकुमार चौधरी (37) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी निरंजन याच्याजवळ एक गावठी कट्टा, पाच जिवंत काडतुसे होती. तर सुरेशकुमारजवळ एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. पोलिसांनी हत्यारे जप्त करून दोघांवर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.

Exit mobile version