| नवीन पनवेल। वार्ताहर ।
एमबीबीएसला अॅडमिशन मिळवून देण्याचे आश्वासन देऊन दोघा भामट्यांनी नंदुरबार येथील एका माजी सैनिकाची 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजवीर सिंग आणि हिमांशू तिवारी अशी या भामट्यांची नावे असून सीबीडी पोलिसांनी या दोघांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. माजी सैनिक अशोक वाघ (54) हे नंदुरबार येथे राहण्यास असून त्यांच्या मोठ्या मुलीने बारावीचे शिक्षण घेऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठी वाघ आपल्या मुलीच्या एमबीबीएसच्या अॅडमिशन मिळविण्याच्या प्रयत्नात होते. याबाबतची माहिती सीबीडी सेक्टर-15 मधील ब्रम्हा कॉम्फ्लेक्स इमारतीत कार्यालय थाटून बसलेल्या राजवीर सिंग याला मिळाल्यानंतर त्याने गत जानेवारी महिन्यामध्ये वाघ यांना संपर्क साधून त्यांच्या मुलीला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये 40 लाख रुपयांमध्ये एमबीबीएससाठी डमिशन मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यापूर्वी या दोघा भामट्यांनी अनेक व्यक्तींकडून लाखो रुपये उकळून पलायन केल्याचे बोलले जात आहे.