। अलिबाग । प्रतिनिधी ।
गणरायानंतर आता गौरींच्या आगमनाची लगबग जिल्ह्यात सुरू झाली. मंगळवारी जिल्ह्यात 15 हजार 853 ठिकाणी गौरींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गौराईच्या स्वागतासाठी व सजावटीसाठी लागणार्या साहित्य, वस्तूंची खरेदी करण्यासाठी सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील बाजारपेठा फुलून गेल्या.
गौरीचा सण हा विशेषतः महिलांचा सण म्हणून ओळखला जातो. दिड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर मंगळवारी जिल्ह्यात घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. गौराईच्या स्वागतासाठी लागणारे गौरीचे आकर्षक मुखवटे, तेरड्याची पाने, फेटे, कपडे, दागिने, पुजनाचे साहित्य अशा अनेक वस्तू जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. अलिबागसह जिल्ह्यातील अनेक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसून आली. जिल्ह्यात काही ठिकाणी मुर्तींचे तर काही ठिकाणी मुखवट्यांचे पूजन केले जाणार आहे.