मिठाई उत्पादक, विक्रेत्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन
| खास प्रतिनिधी | रायगड |
जिल्ह्यातील मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी सणासुदीच्या काळात मिठाईसह अन्य अन्नपदार्थांच्या सेवनामुळे विषबाधासारखी अप्रिय घटना घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, तसेच सर्व सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
मिठाई उत्पादक, विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनेचा परिसर हा पर्यावरणीय दृष्टीने व कीटकापासून संरक्षित व स्वच्छ ठेवावा. कच्चे अन्नपदार्थ परवानाधारक, नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावेत, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, पाणी पिण्यायोग्य असल्याबाबत अहवाल प्राप्त करून घ्यावा, तयार अन्नपदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच व्यवस्थित झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीने अन्नपदार्थ हाताळू नयेत, मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्यरंगाचा अत्यल्प प्रमाणात वापर करावा (100 पीपीएमपेक्षा कमी), अन्नपदार्थ ग्राहकांना देताना, अन्नपदार्थ पॅकिंग करताना वर्तमानपत्राचा वापर करू नये, बंगाली मिठाई 24 तासांच्या आत खाण्याबाबत ग्राहकांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
मिठाई बनविताना तसेच हाताळणार्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अॅप्रन वापरावे, मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचा व उच्च प्रतीचा असावा, मिठाई हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावे, अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या आस्थापनेचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे व त्याचा अभिलेखा ठेवावा, आस्थापनेत कार्यरत अन्न हाताळणार्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी व त्याचा अभिलेखा ठेवावा, अन्न आस्थापनेत 25 कर्मचार्यांच्या मागे एक असे फोस्टॅक ट्रेनिंग प्राप्त फुड सेफ्टी सुपरवायझर नियुक्त करावा, अशा सूचनादेखील अन्न व औषध प्रशासन विभागाने केल्या आहेत. अन्नपदार्थाच्या दर्जाविषयी ग्राहकांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री 1800 222365 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.